

पुणे: मुळा-मुठा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून राबविण्यात येणाऱ्या 'जायका' प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिका भवनसमोर टिळक पुलाजवळ नदीपात्रात १६०० मि.मी. व्यासाची मलवाहिनी टाकताना खड्ड्यातील पाणी आणि चिखल न काढताच जोडणी केली जात आहे.
पाइप उचलण्यासाठी क्रेन वापरण्याऐवजी पोकलेनने ते ढकलून खड्ड्यात टाकले जात असल्याचेही दिसून आले. त्यामुळे मलवाहिनीच्या जोडण्यांची मजबुती आणि भविष्यातील सांडपाणी गळतीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. महापालिकेच्या दारातच हे काम सुरू असताना देखरेख करणारी यंत्रणा नेमकी काय करीत आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत जपानच्या 'जायका' बँकेच्या अर्थसाहाय्याने हा प्रकल्प गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. प्रकल्पातील मैलापाणी प्रक्रिया केंद्रांची (एसटीपी) कामे ९५ टक्के पूर्ण झाली आहेत. मात्र, ५३ किलोमीटर लांबीच्या मलवाहिन्या टाकण्याचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत केवळ २१ किमी.चे काम पूर्ण झाले आहे. कामाच्या संथगतीनंतर आता गुणवत्तेचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.
चिखलात जोडणी; रबर रिंग तुटले
टिळक पुलाजवळ मलवाहिनीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पाइपचा अर्धा भाग बुडेल इतके पाणी आणि चिखल साचला आहे. हा चिखल काढण्याऐवजी त्याच परिस्थितीत पाइपची जोडणी केली जात होती. त्यामुळे मलवाहिनीची पातळी असमान राहण्याची आणि जोडण्यांमधून सांडपाणी गळण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून मात्र चिखलात खडी टाकून त्यावर मलवाहिन्या बसवल्याचा दावा करण्यात आला आहे. दोन पाइप जोडताना वापरण्यात येणारी रबराची रिंग तुटल्याचेही निदर्शनास आले आहे. जोडणीच्या ठिकाणी लावलेल्या सिमेंटला पुरेसे पाणी न मारल्याने त्याला भेगा पडल्याचे दिसत आहे. या त्रुटींमुळे मलवाहिन्यांच्या जोडण्यांची मजबुती धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
निविदेतील अटींना हरताळ; ठेकेदाराला नोटीस देणार
निविदेतील अटींनुसार मलवाहिन्या क्रेनच्या साहाय्याने उचलून नियोजित ठिकाणी व्यवस्थित बसविणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात पोकलेनच्या साहाय्याने पाइप दूरवरून ढकलत खड्ड्यात टाकत आहेत. या पद्धतीमुळे पाइपचे नुकसान होऊन जोडण्यांमध्ये त्रुटी निर्माण होण्याचा धोका आहे. दरम्यान, या प्रकाराची दखल घेत प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता संजय गायकवाड यांनी त्रुटी दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले आहे. क्रेनऐवजी पोकलेनचा वापर करून पाइप टाकणे चुकीचे असल्याचे त्यांनी मान्य केले. संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्यात येईल आणि खराब झालेले पाइप बदलण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.