Sassoon Hospital Pudhari
पुणे

Sassoon Hospital Destitute Patients: बेवारस रुग्णांच्या उपचारांबाबत ससून रुग्णालयाचे स्पष्टीकरण

४४० अनोळखी रुग्णांवर उपचार; ओळख पटवण्यापासून पुनर्वसनापर्यंत ठरलेली प्रक्रिया स्पष्ट

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरात अनेकदा रस्त्यावर आढळणारे अनोळखी, बेवारस किंवा ओळख पटत नसलेले रुग्ण उपचारासाठी ससून रुग्णालयात आणले जातात. अशा रुग्णांच्या उपचारापासून त्यांच्या पुनर्वसनापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया नियमावलीनुसार पार पाडली जाते, असे ससून प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ससूनमधील अस्थिरोग विभाग, मेडिसिन, सर्जरी, बर्न, कान-नाक-घसा अशा विविध विभागांमध्ये गेल्या वर्षभरात 440 अनोळखी आणि बेवारस रुग्णांनी उपचार घेतले आहेत. बहुतांश वेळा बेवारस रुग्ण अंथरुणाला खिळलेले असतात. अनोळखी रुग्ण आपत्कालीन विभागात दाखल झाल्यानंतर सर्वप्रथम कार्यरत वैद्यकीय अधिकारी त्यांची प्राथमिक तपासणी करतात. रुग्णाची स्थिती पाहून त्याची मेडिकोलीगल नोंद करण्यात येते आणि संबंधित माहिती तत्काळ पोलिसांना कळवली जाते, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लपा जाधव यांनी दिली.

अशी होते प्रक्रिया

  • प्रकृती स्थिर असलेल्या रुग्णांच्या बाबतीत समाजसेवा विभाग पुढे येतो. अशा रुग्णांना शासनमान्य किंवा नोंदणीकृत संस्थांकडे पुनर्वसनासाठी पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. दुसरीकडे प्रकृती गंभीर किंवा अत्यवस्थ असल्यास त्यांना होणारा त्रास कमी करण्यासाठी संबंधित विषयतज्ज्ञांकडे तपासणी व उपचारासाठी संदर्भित केले जाते.

  • अनोळखी रुग्णांची भरती होताच संबंधित विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक आणि पथक प्रमुखांना सूचना देणे बंधनकारक आहे. समाजसेवा अधीक्षक आणि त्यांचे कर्मचारी रुग्णाला योग्य वॉर्डमध्ये दाखल करून पुढील काळजी सुनिश्चित करतात. अशा रुग्णांच्या देखभालीसाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते, जे रोजच्या उपचारांवर लक्ष ठेवतात.

  • समाजसेवा विभागातील अधिकारी केवळ उपचारांची खात्री करत नाहीत, तर रुग्णांच्या नातेवाइकांचा शोध घेणे हेही त्यांच्या जबाबदारीचा महत्त्वाचा भाग असतो. रुग्णाची ओळख पटवून कुटुंबीयांपर्यंत पोहोचवणे किंवा योग्य संस्थेमार्फत त्यांचे पुनर्वसन पूर्ण करणे हा या प्रक्रियेचा अंतिम टप्पा असतो.

ससून रुग्णालयात संवेदनशील पद्धतीने बेवारस रुग्णांवर उपचार केले जातात. बेवारस रुग्णांची इतरही शासकीय रुग्णालयांमध्ये सोय झाल्यास ससून रुग्णालयावरील बेवारस रुग्णांचा 50 टक्के ताण कमी होईल. त्यामुळे येथील बेवारस रुगणांची सेवा योग्य प्रकारे करता येईल.
डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून रुग्णालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT