Devendra Fadanvis Pudhari
पुणे

Maharashtra SARTHI Institute: मराठा समाजासाठी शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराचे प्रभावी व्यासपीठ: फडणवीस

'सारथी'मुळे UPSC, MPSC आणि बँकिंग क्षेत्रात हजारो युवकांना यश; सामाजिक परिवर्तनाची प्रभावी चळवळ असल्याचा गौरव

पुढारी वृत्तसेवा

पुणे: मराठा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी पोहोचविण्यासाठी 'सारथी' संस्थेची स्थापना करण्यात आली. स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणाबरोबरच संशोधन, पीएच.डी., कौशल्य विकास, रोजगाराभिमुख प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानातील कौशल्य विकसित करण्यासाठी 'सारथी'ने प्रभावी काम केले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणेच्या वतीने गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांच्या सन्मान सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महापौर मंजूषा नागपुरे, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, मनपा आयुक्त नवलकिशोर राम, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, नियोजन विभागाच्या सचिव शैला ए, विभागीय आयुक्त शीतल तेली उगले, 'सारथी'चे अध्यक्ष अजित निंबाळकर, व्यवस्थापकीय संचालक महेश पाटील आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, की मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी शिक्षण, कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, उद्योजकता आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संधी उपलब्ध करून देण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले आहे. त्यासाठीच मराठा आरक्षणाचे मोर्चे निघाल्यानंतर 'सारथी'ची स्थापना करण्यासह अन्य योजना लागू करण्यात आल्या आहेत. 'सारथी'च्या माध्यमातून आतापर्यंत केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षेत १४०, महाराष्ट्र लोकसेवा आयोग १ हजार १२४ आणि बँकिंग क्षेत्रात ५०० हून अधिक तरुण-तरुणी यशस्वी झाले आहेत. सारथी संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर यांनी प्रास्ताविक केले.

सारथी ही सामाजिक परिवर्तनाची प्रभावी चळवळ

सारथी ही केवळ शासकीय योजना राबवणारी संस्था नसून, सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ आहे. समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि तळागाळातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार सारथीच्या कार्यातून प्रत्यक्षात येत असल्याचे गौरवोद्‌गार उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी काढले.

फडणवीस असेही म्हणाले,

  • 'महाविस्तार' ॲपचा ५० लाख शेतकरी घेत आहेत लाभ

  • 'सारथी'मार्फत ड्रोन पायलट प्रशिक्षणही सुरू

  • 'सारथी'ची विविध ठिकाणी विभागीय केंद्रे सुरू होणार

  • दोन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षणांचा लाभ

  • मराठा समाजासाठी शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार या तीन पैलूंवर आधारित धोरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT