Sapna Chhajed Pudhari
पुणे

Pune Sapna Chhajed BJP Corporator: सासऱ्यांकडून राजकारणाचे धडे; प्रभाग ७ मध्ये सपना छाजेड यांचा विकासाचा संकल्प

पाणी, कचरा, आरोग्य व झोपडपट्टीवासीयांसाठी पक्क्या घरांना प्राधान्य; २०० खाटांचे दोन दवाखाने उभारण्याची घोषणा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: राजकीय क्षेत्रातील माझी जडणघडण सासरीच झाली. मला आठवते, मला पाहण्याचा कार्यक्रम होता. त्यात माजी मंत्री आणि सासरे चंद्रकांत छाजेड यांनी 4 तास राजकीय क्षेत्रासह विविध विषयांवरील अनेक प्रश्न मला विचारले. मी देखील त्यांना योग्य उत्तरे दिली. लग्नानंतर पुढे त्यांचे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील काम जवळून पाहण्याचा योग आला. यातूनच लोकांचे प्रश्न समजून घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांचे प्रश्न सोडवण्याचे कसब अंगी आले. त्याचाच फायदा मला महापालिकेच्या निवडणुकीत झाला आणि मी निवडून आले.

प्रभागात सध्या पाणी, कचरा, आरोग्याचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याची गरज आहे. त्यावरच काम करणे हा संकल्प आहे, असे मत प्रभाग क्रमांक 7 मधील ‌‘ब‌’ गटातील भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका सपना छाजेड यांनी व्यक्त केला. सपना आनंद छाजेड यांनी दैनिक ‌‘पुढारी‌’च्या कार्यालयाला नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी आपला राजकीय प्रवास कथन केला. तसेच प्रभागात कोणती कामे प्राधान्याने करणार याबाबत देखील आपला संकल्प बोलून दाखवला.

सपना छाजेड म्हणाल्या, माझे माहेर सोलापूर जिल्ह्यातील जेऊर (ता. करमाळा) हे गाव. मला लहानपणापासून अभिनय अन्‌‍ खेळण्याचा छंद होता. मी बास्केट बॉलपटू असून, राज्यस्तरीय स्पर्धेतही भाग घेतला होता. माझे पदवीपर्यंत शिक्षण झाले असून, पुण्यातील एसएनडीटी कॉलेजमधून पाककलेचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुण्याचे माजी महापौर, काँग््रेासचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री चंद्रकांत छाजेड यांचा मुलगा आनंद छाजेड यांच्याशी माझा विवाह झाला.

‌‘मामू‌’ म्हणून प्रसिद्ध असलेले माझे सासरे चंद्रकांत छाजेड हे बोपोडी भागातून पाच वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांनी 1987-88 मध्ये पुण्याचे महापौरपद भूषवले. 2004 मध्ये बोपोडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले. दरम्यान, माझे पती आनंद हे 2007 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेल्यावर मी प्रामुख्याने घर सांभाळले. या काळात सासऱ्यांकडून मला आणि माझे पती आम्हा दोघांना राजकारणाचे धडे मिळत होते. जनतेचे प्रश्न कसे हाताळावेत, जनसंपर्क कसा वाढवावा हे शिकत गेले.

सासऱ्यांच्या मृत्यूनंतर तब्बल 20 वर्षे प्रत्यक्ष राजकारणापासून आम्ही दूर असलो तरी सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कार्य आम्ही सुरूच ठेवले होते. कोणतेही पद नसताना स्पर्धा परीक्षार्थींसाठी आम्ही अभ्यासिका उभारली. परिसरातील महिलांसाठी आरोग्य शिबिरे घेतली. यासह विविध सामाजिक कामे देखील करत गेलो. आम्ही 2017 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यावर दोघांनीही प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यास सुरुवात केली होती. पुढे निवडणुका लागल्यावर हा प्रभाग महिलांसाठी राखीव झाला. त्यामुळे मी उभे राहावे, अशी मनीषा पती आनंद छाजेड यांनी बोलून दाखवली. सुरुवातीला थोडी घाबरले. मात्र, नंतर निवडणूक लढण्याचा निर्धार करून प्रचाराला सुरुवात केली. सासऱ्यांच्या पुण्याईबरोबरच त्यांचे सत्कार्य आम्ही सुरू ठेवल्याने निवडणुकीत आम्ही यश मिळवू शकलो आणि मी निवडून आले, असेही छाजेड यांनी सांगितले.

प्रभागात करणार ही कामे

  • झोपडपट्टीवासीयांना पक्के घरे देण्यासाठी प्राधान्याने काम करणार.

  • प्रभागात 200 खाटांची व्यवस्था असणारे दोन मल्टीस्पेशालिटी दवाखाने उभारणार.

  • प्रभागात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार.

  • सिद्धार्थनगर, आंबेडकरवस्ती, विद्याविहार भागात नव्या ड्रेनेजलाइनची कामे करणार.

  • प्रभाग कचरामुक्त करणार.

  • चिखलवाडी येथील हॉकीचे मैदान अद्ययावत करणार.

  • प्रभागातील मुलांना खेळासाठी चांगले मैदान उपलब्ध करून देणार

  • महापालिकेच्या शाळा अद्ययावत करून त्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावणार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT