Sant Tukaram Vaikunth Gaman Pudhari
पुणे

Sant Tukaram Vaikunth Gaman: इंद्रायणीकाठी वैष्णवांचा मेळा; देहूत संत तुकाराम महाराजांचा ३७८वा वैकुंठगमन सोहळा भक्तिमय वातावरणात

लाखो वारकऱ्यांची उपस्थिती, टाळ-मृदंगाच्या गजरात दिंड्या-पालखीने देहूनगरी दुमदुमली; नगरपंचायतीकडून व्यापक व्यवस्था

पुढारी वृत्तसेवा

देहूगाव : जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या 378 व्या सदेह वैकुंठगमन सोहळा गुरुवारी लाखो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडला. लाखोंच्या संख्येने वारकरी देहूनगरीत दाखल झाल्याने जणूकाही वैष्णवांचा मेळा भरल्याचे दृश्य देहूगावात दिसून आले.

खांद्यावर वैष्णव धर्माच्या पताका, टाळ-मृदंगाच्या गजरात ‌‘ज्ञानोबा-तुकाराम‌’च्या जयघोषात नाचत-बागडत येणाऱ्या दिंड्या, गरुड टक्के आणि वाजतगाजत निघालेली पालखी यामुळे वातावरण पूर्णपणे भक्तिमय बनले होते. मुख्य मंदिर परिसरात महिला वारकऱ्यांनी फेर धरत फुगड्या खेळल्या. एकमेकांचे चरणस्पर्श, गळाभेट घेत आनंद व्यक्त करीत खुशाली विचारण्याचे भावस्पर्शी दृश्य सर्वत्र अनुभवायला मिळाले. एकूणच, भक्तिभाव, नामसंकीर्तन आणि उत्साहाच्या लहरीत न्हालेला 378 वा वैकुंठगमन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

नगरपंचायतीकडून सर्वतोपरी व्यवस्था

देहूनगर पंचायतीच्या वतीने वारकरी भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले होते. मुख्याधिकारी चेतन कोंडे, नगर अभियंता संघपाल गायकवाड यांच्यासह अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित राहून व्यवस्थेवर लक्ष ठेवले. स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक व इतर मूलभूत सुविधांची काटेकोर व्यवस्था करण्यात आली होती. वीज वितरण विभागाकडून अखंडित वीजपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली.

कडक पोलिस बंदोबस्त

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय यांच्या वतीने कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. योग्य नियोजनामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. वारकरी भाविकांना शांततेत सोहळ्याचा आनंद घेता आला. तथापि, कर्तव्य बजावत असलेल्या काही पोलिसांकडून पत्रकारांना अडविणे व अरेरावीची भाषा केल्याच्या तक्रारी पुढे आल्या.

तसेच काही ठिकाणी जेवणाच्या गाड्यांना प्रवेश न दिल्याने गैरसोय झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. देवस्थान संस्थानच्या काही विश्वस्तांनी विनंती करूनही सहकार्य मिळाले नसल्याने, देवस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त, पत्रकार, स्थानिक ग्रामस्थ व वारकरी भाविकांनी संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबत नाराजी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT