पुणे : राज्यसभेसाठी शिवसेनेकडून दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार म्हणून पुण्यातील काँग््रेासचे रोहित टिळक यांचे नाव जवळपास निश्चित झाले होते, अशी धक्कादायक माहिती गुरुवारी (दि.5) समोर आली. मात्र, महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय महायुतीने घेतला अन् टिळकांच्या राज्यसभेच्या उमेदवारीची संधी हुकली.
राज्यसभेच्या सात रिक्त जागांसाठी गुरुवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यात भाजपकडून रामदास आठवले, विनोद तावडे, रामराव वडकुते, माया इनवते, राष्ट्रवादी काँग््रेासकडून पार्थ पवार, शिवसेनेकडून ज्योती वाघमारे आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी अर्ज भरले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे निश्चित झाले. दरम्यान, या निवडणुकीत आठवा उमेदवार उभा करून तो निवडून आणून महाविकास आघाडीला धक्का देण्याचे नियोजन महायुतीकडून करण्यात आले होते. त्यात शिवसेनेकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार होते. त्यात दुसरा उमेदवार म्हणून काँग््रेासचे रोहित टिळक यांचे नाव निश्चित झाले होते, असे गुरुवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी उजेडात आले. मात्र, महाविकास आघाडीकडून पवार यांचे नाव निश्चित झाल्याने महायुतीने ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी तयारीनिशी मुंबईत आलेल्या टिळक यांचा अर्ज दाखल करण्यात आला नाही.
दरम्यान, टिळकांचे नाव थेट शिवसेनेकडून निश्चित झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. टिळक हे लोकमान्य टिळक यांचे खापरपणतू आहेत. टिळक हे काँग््रेासचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. स्वतः रोहित टिळक यांनी कसबा विधानसभा मतदारसंघातून काँग््रेासकडून निवडणूक लढविली आहे. अशा परिस्थितीत त्यांना शिवसेनेकडे अनेक इच्छुक दावेदार असताना टिळकांचे नाव अचानक शिवसेनेकडून स्पर्धेत कसे आले, अशी चर्चा रंगली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, टिळक यांचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी जवळचे संबंध आहेत. त्यातच शिवसेनेने सोशल इंजिनीअरिंग म्हणून वाघमारे यांच्या समवेत टिळक यांचे नाव पुढे आणण्याचा विचार केला होता. त्यातून टिळक यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. मात्र, पवार यांच्या व्यतिरिक्त दुसरा उमेदवार उभा केल्यास धोका होऊ शकतो, हे लक्षात घेऊन थेट पवारांना मैदानात उतरून सेफ गेम खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्याचा थेट फटका टिळक यांच्या उमेदवारीला बसला अन् अनपेक्षितरीत्या मिळणार असलेली संधी हुकली. मात्र, आता आगामी काळात टिळक हे शिवसेनेच्या तंबूत जाणार की काँग््रेासमध्येच राहणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राज्यसभेसाठी शिवसेनेकडून दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझे नाव निश्चित केले होते. मात्र, महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना उमेदवारी देण्यात आली. पवार यांचे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान आहे. टिळक कुटुंबीयांशी त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरणे योग्य होणार नाही, अशी चर्चा उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या समवेत झाल्यानंतर आठवा उमेदवार म्हणून माझा अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला.
रोहित टिळक