नीलेश बनकर
शिर्सुफळ: जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने मंगळवारी (दि. १४) सायंकाळी पावणेसात वाजेच्या दरम्यान बारामती तालुक्यात प्रवेश केला. यावेळी पालखीरथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. पालखी सोहळ्याचे तालुक्याच्या हद्दीत खराडेवाडी हद्दीत पंचक्रोशीतील भाविकभक्त व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या भक्तिमय वातावरणात स्वागत केले.
या वेळी तालुक्याच्या वतीने उपजिल्हाधिकारी हनुमंत पाटील, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार स्वप्निल रावडे, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम, गटविकास अधिकारी किशोर माने, संभाजी होळकर, वन परीक्षक अधिकारी अश्विनी शिंदे, महावितरणचे उपअभियंता गणेश जाधव, पंचायत समिती बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रशांत मिसाळ, पंचायत समिती सदस्य अनिकेत गावडे, दूध संघाचे संचालक बापूराव गवळी, मंडळ अधिकारी अशपाक इनामदार, तसेच पदधिकारी उपस्थित होते.
'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष करत संत तुकाराम महाराज पालखी सोहळा सायंकाळी साडेसातच्या दरम्यान, उंडवडी-सुपे येथील पालखीतळावर पोचला. येथे उंडवडीकरांच्या वतीने पालखी सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. मानकऱ्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. पालखी सोहळा तळावर विसावल्यानंतर पंचक्रोशीतील कारखेल, खराडेवाडी, साबळेवाडी, सोनवडी सुपे, देऊळगाव रसाळ, कोळोली, शिर्सुफळ, गाडीखेल आदी गावांतील ग्रामस्थांनी दर्शनासाठी रांगा लावून रात्री उशिरापर्यंत दर्शन सुरू होते.
'ज्ञानोबा-तुकोबा'च्या जयघोषात हजारो वारकरी टाळ-मृदंगाच्या गजरात उंडवडी सुपेत दाखल झाली, या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. वारकरी संप्रदायाच्या भक्ती, समता आणि सेवाभावाचा संदेश देणारा हा पालखी सोहळा बारामती तालुक्यासाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. पालखीतळावर पालखी विसावल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी आरती, प्रवचन, कीर्तन व भजन आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळाप्रमुख व देहू संस्थानाध्यक्ष ह.भ.प. जालिंदर महाराज मोरे, ह.भ.प. उमेश महाराज मोरे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे, ह.भ.प. विक्रम महाराज मोरे, विश्वस्त ह.भ.प. गणेश महाराज मोरे, ह.भ.प. दिलीप महाराज मोरे, ह.भ.प. वैभव महाराज मोरे, तसेच माजी विश्वस्त ह.भ. प. भानुदास महाराज मोरे, ह.भ.प.अभिजित महाराज मोरे या पालखी सोहळाप्रमुख व संत तुकाराम महाराज देहूगाव संस्थान विश्वस्तांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. उंडवडीकरांच्या वतीने वारकऱ्यांना रात्रीचे पिठलं-भाकरीचे भोजन देण्यात आले. सुपे पोलिसांच्या वतीने पालखी तळ परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. ग्रामपंचायतीच्या वतीने वारकऱ्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी नळ पाणीपुरवठा व टॅंकरची व्यवस्था करण्यात आली. बुधवारी (दि. १५) सकाळी पालखी सोहळा बारामतीमार्गे पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असून बारामतीत पालखी मुक्कामी असणार आहे.