Sant Tukaram Maharaj Palkhi Pudhari
पुणे

Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala: पाच नाथांच्या साक्षीने दौंड तालुका भक्तीरंगात; संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे जल्लोषात स्वागत

यवतपासून रोटीपर्यंत हरिनामाचा गजर; ग्रामदैवतांचा आशीर्वाद, वारकऱ्यांची सेवा आणि भक्तीचा अनोखा संगम

पुढारी वृत्तसेवा

रामदास डोंबे

खोर: महाराष्ट्राच्या संतपरंपरेचे वैभव आणि वारकरी संप्रदायाच्या अखंड भक्तीचा महासागर असलेला जगद्गुरू संत शिरोमणी श्री तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा दौंड तालुक्यातून मार्गक्रमण करत असताना भक्ती, सेवा आणि श्रद्धेचा अनुपम संगम अनुभवायला मिळाला. तालुक्यातील यवतचे श्री काळभैरवनाथ, भांडगावचे श्री रोकडोबानाथ, चौफुल्याचे श्री बोरमलनाथ, वरवंडचे श्री गोपीनाथ आणि दौंड तालुक्याच्या शेवटच्या टप्प्यातील रोटी गावचे श्री रोटमलनाथ या पाच नाथांच्या पावन भूमीत पालखीचे झालेले उत्स्फूर्त स्वागत वारकरी संप्रदायासाठी अविस्मरणीय ठरले.

ज्ञानोबा-तुकारामच्या अखंड जयघोषाने आसमंत दुमदुमून गेला होता. भगव्या पताका, टाळ-मृदंगाचा निनाद, हरिनामाचा अखंड गजर, फुलांची उधळण आणि हजारो वारकऱ्यांचा भक्तिमय उत्साह यामुळे दौंड तालुका अक्षरशः भक्तीरंगात न्हाऊन निघाला. प्रत्येक गावाने आपले ग्रामदैवत आणि संतपरंपरा यांचा संगम घडवत पालखीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.

यवत येथे श्री काळभैरवनाथांच्या साक्षीने पालखीचे भावपूर्ण स्वागत करण्यात आले. त्यानंतर भांडगावमध्ये श्री रोकडोबानाथांच्या कृपाछायेखाली वारकऱ्यांसाठी न्याहारी, महाप्रसाद, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि विविध सेवा उपक्रम राबविण्यात आले. चौफुला येथे श्री बोरमलनाथांच्या सान्निध्यात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. पुढे वरवंड नगरीत श्री गोपीनाथांच्या पावन भूमीत पालखी मुक्कामी दाखल होताच हरिनामाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

मुक्कामानंतर पालखी सोहळा पुढे रोटी घाट पार करून दौंड तालुक्याच्या शेवटच्या टप्प्यातील रोटी गावात पोहोचला. तेथे श्री रोटमलनाथांच्या साक्षीने पालखीचे अत्यंत भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. रोटी हे दौंड तालुक्याच्या सीमेवरील अखेरचे गाव असल्याने येथे पालखीला निरोप देताना वारकरी आणि ग्रामस्थ भावुक झाले. "पुन्हा या तुकोबा..." अशा भावपूर्ण जयघोषात भक्तीचा अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळाला.

वारकरी संप्रदायात संतांची पालखी आणि ग्रामदैवतांचे आशीर्वाद यांचा संगम ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची अनमोल परंपरा मानली जाते. दौंड तालुक्यातील या पाच नाथांच्या सान्निध्यात झालेल्या स्वागतामुळे पालखी सोहळ्याला विशेष आध्यात्मिक उंची लाभली. ग्रामस्थांनी वारकऱ्यांसाठी महाप्रसाद, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा, निवास व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून सेवाभावाचा आदर्श घालून दिला.

दौंड तालुक्याने केवळ पालखीचे स्वागतच केले नाही, तर भक्ती, समता, सेवा आणि सामाजिक ऐक्याचा संदेशही कृतीतून जगासमोर ठेवला. पाच नाथांच्या आशीर्वादाने आणि लाखो विठ्ठलभक्तांच्या हरिनामाने भारावलेला हा पालखी सोहळा दौंड तालुक्याच्या धार्मिक व सांस्कृतिक वैभवाचा सुवर्ण अध्याय ठरला.

पाच नाथ... एकच भक्तीभाव!

यवतचे श्री काळभैरवनाथ, भांडगावचे श्री रोकडोबानाथ, चौफुल्याचे श्री बोरमलनाथ, वरवंडचे श्री गोपीनाथ आणि रोटीचे श्री रोटमलनाथ या पाच ग्रामदैवतांच्या पावन सान्निध्यातून मार्गक्रमण करत तुकोबारायांचा पालखी सोहळा दौंड तालुक्यातून पुढे गेला. संतपरंपरा, ग्रामदैवतांचा आशीर्वाद आणि वारकरी भक्तीचा असा सुंदर संगम क्वचितच अनुभवायला मिळतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT