PMC Election Pudhari
पुणे

PMC Election: दिग्गजांचे डिपॉझिट जप्त करणारा ‘तो’ विजय! संजय बालगुडे यांची निवडणूकगाथा पुन्हा उलगडली

एकाकी सुरुवात, प्रचंड जनसमर्थन आणि दिग्गजांना धक्का देणारा निकाल — युवा नेते संजय बालगुडेंच्या संस्मरणीय विजयाची कहाणी

पुढारी वृत्तसेवा

संजय बालगुडे

सलग पाच वर्षे पीएमपीचे अध्यक्ष, पंधरा वर्षे युवक काँग््रेासचे अध्यक्ष, दोन वेळा नगरसेवक आणि शहराच्या प्रश्नांची सखोल जाण, तत्कालीन मुख्यमंत्र्यांना राजीनामा देणे भाग पाडण्यास कारणीभूत ठरलेले अभ्यासू काँग््रेास नेते अशी संजय बालगुडे यांची ओळख... महापालिकेच्या दोन निवडणुका त्यांनी लढविल्या. त्यांची पहिली निवडणूक दिग्गजांचे डिपॉझिट जप्त करणारी होती. मात्र, दुसऱ्या निवडणुकीत त्यांना परभवाचा सामना करावा लागला, तरीही सभागृहात अभ्यासू प्रतिनिधी हवा म्हणून पक्षाने त्यांना पुन्हा महापालिकेत पाठविले. त्यांनी लढविलेल्या या संस्मरणीय निवडणुकांची गोष्ट त्यांच्याच शब्दात....

पीएमपीच्या अध्यक्षपदाची मुदत संपून वर्ष झाले होते. सन 1997 मधील महापालिका निवडणूक फेबुवारी महिन्यात झाली. युवक काँग््रेासचे अध्यक्षपदही माझ्याच कडे होते. चार वर्षांच्या कालावधीत पीएमपीमध्ये केलेले काम, नोकर भरती बरोबरच कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे नाव चांगलेच चर्चेत होते. माझा प्रभाग क्र. 90 सर्वसाधारण झाला होता. त्यामुळे साहजिकच मला उमेदवारी मिळणे अपेक्षित होते.

मागील 1985 च्या महापालिका निवडणुकीत 110 मतांनी पराभूत झालो होतो. पराभवाचा हा शिक्का पुसायचा होता. 1985 च्या निवडणुकीच्या वेळची पार्श्वभूमीच काही वेगळी होती. माझे महाविद्यालयीन शिक्षण संपून चार-पाच महिनेच झाले होते. दिलीप ढेरे यांच्या शिफारशीवरून काँग््रेासचे तत्कालीन नेते रामकृष्ण मोरे सरांनी मला काँग््रेासचे तिकिट दिले होते. माझे मोठे बंधू आणि मोरे सरांची मैत्री होती. त्यामुळे ते मलाही ओळखत होते. पण दुर्दैवाने या निवडणुकीत मला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर मोरे सरांनी युवक कॉंग््रेासच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपविली. माझे कामही उत्तमरित्या सुरू होते. पुढे 1991 मध्ये पीएमपीचा सभासद झालो. 1997 च्या निवडणुकीची ही पार्श्वभूमी होती.

पक्षाने तिकिट देताच या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. माझ्या विरोधात विद्यमान नगरसेवक, एक माजी नगरसेवक व एक धनदांडगी व्यक्ती हे प्रमुख प्रतिस्पर्धी होते. या सर्वांना वाटत होते की, मी ज्या खडकमाळ आळी परिसरात राहतो, तेथेच मला थोडीबहुत मते मिळतील. त्यामुळे घोरपडे पेठ व अन्य भागात आपण चांगली मते मिळवू. पीएमपी अध्यक्ष असताना नोकरीला लावलेली मुले आणि त्यांचे कुटुंबीय बहुसंख्येने घोरपडे पेठेतील होते. त्यामुळे ही तरुण मुले , त्यांची कुटुंबे आणि नातेवाईक मनापासून माझ्या मागे उभे राहिले. ते म्हणत, ‌‘अध्यक्ष तुमच्या भागात आपण चांगली मते घेऊ, काळजी करू नका.‌’ आश्वासन आणि दिलासा देऊन ते थांबले नाहीत, तर ही सारी मंडळी माझ्या प्रचाराला लागली. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले.

अशात आमच्या एका प्रतिस्पर्धी उमेदवाराने तरुण कार्यकर्त्यांसाठी दारू व मटणाच्या पार्ट्या सुरू केल्या. आमच्या भागात हे प्रथमच घडत होते. किंबहूना तेव्हापासूनच दारू-मटणाच्या पार्ट्यांचा पायंडा सुरू झाला. आमच्या भागात हे प्रथम घडत होते. पार्टीचा पायंडा तेव्हापासून सुरू झाला. पैसेवाल्या उमेदवाराकडून लक्ष्मी दर्शनही सुरू झाले होते. अशाही परिस्थितीत माझ्या कार्यकर्त्यांचा विश्वास जराही डळमळीत झाला नाही. त्यांना विजयाची खात्री होती. निवडणूक अटीतटीची होऊ लागल्याचे दिसताच काँग््रेासचे पुणे शहराचे नेते सुरेश कलमाडी यांनी स्वतः माझ्यासाठी जीपरॅली काढली. तर, काँग््रेासचे दिवंगत नेते व केंद्रीय मंत्री बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांनी स्वतः कोपरा सभा घेऊन माझा प्रचार केला. या दोन दिग्गजांनी केलेला प्रचार हा माझ्यासाठी मोठा आशीर्वादच होता. माझे सहकारी राजाभाऊ शिंदे आणि मित्र परिवार प्रचारासाठी विविध क्लृप्त्या लढवित होते. अशात राजाभाऊंनी, ‌‘एकच ध्यास, परिसराचा विकास‌’ ही घोषणा देण्यास सुरुवात केली. पाहता-पाहता ती गल्ली-बोळात पोहचली. त्यामुळे चौका-चौकात ही घोषणा ऐकू येऊ लागली.

महिलावर्गाचा सुप्त पाठींबा

शहरातील निवडणुकांचा कानोसा घेताना ‌‘पुढारी‌’च्या बातमीदाराने माझ्या वॉर्डातील मतदारांशीही चर्चा करून एक वार्तापत्र लिहिले होते. त्यात त्यांनी महिला वर्गाचा बालगुडे यांना वाढता पाठींबा असल्याचे नमूद केले होते. मी जेव्हा प्रचारासाठी फिरत होतो, त्यावेळी या माता- भगिनीही मला पाठींबा असल्याचे सांगत होत्या. पण त्याचबरोबर महिलांना रोजगारासाठी काही तरी करावे, अशी अपेक्षाही व्यक्त करीत होत्या. निवडून आल्यानंतर अंध, अपंग, विधवा, परित्यक्त्या, निराधार असलेल्या या भगिनींना रोजगार देण्यासाठी 28 दुकाने उपलब्ध करून देण्याचे काम मला करता आले. या द्वारे दिलेल्या शब्दाला जागल्याचे अल्पसे समाधानही मिळाले.

एकाच उमेदवाराने राखले डिपॉझिट

एकीकडे पार्ट्या आणि पैशाचे वाटप सुरूच होते. अशा वातावरणातच मतदानाचा दिवस उजाडला. मतदान केंद्राच्या दारात मी एकटाच उभा होतो. माझे समर्थक कार्यकर्ते वेगळ्या-वेगळ्या बुथवर कार्यरत होते. मी एकटाच असल्याचे पाहून विरोधकांना वाटले की, बालगुडेंची सीट आता गेली. परंतु, मतदान संपल्यानंतर माझ्या कार्यालयासमोर आणि चौकात जमलेल्या गर्दीवरून मला विजयाचा अंदाज आला. विशेष म्हणजे पोलिस कॉलनी, झगडेवाडी, घोरपडे पेठ आणि आमची गल्ली सर्व ठिकाणी भरभरून मतदान झाले. माझ्या विरोधात उभ्या असलेल्या चौदापैकी फक्त एकाच उमेदवाराला डिपॉझिट राखता आले. इतर सर्वांचे डिपॉझिट गुल झाले. सव्वा आठ हजार मतदारांच्या या मतदारसंघात सर्वाधिक फरकाने निवडून येणारा मी पहिलाच उमेदवार ठरलो. झालेल्या 5 हजार 500 मतदानांपैकी 2 हजार 921 मते मला मिळाली होती. त्यामुळे अनेक दिग्गजांचे डिपॉझिट जप्त करणारी ही निवडणूक कायमची स्मरणात राहिली. या निवडणुकीत (1997) महापालिकेत काँग््रेासला 124 पैकी 70 जागा मिळाल्या. याचे सारे श्रेय तत्कालीन खासदार सुरेश कलमाडींकडे जाते.

एक प्रश्न अन्‌‍... मुख्यमंत्र्यांचा राजीनामा

नगरसेवकपदी विराजमान होऊन काम करत असताना वर्षभरानंतर म्हणजे 1998 मध्ये प्रभात रस्त्यावरील फायनल प्लॉट क्रमांक 102 वरील शाळेचे आरक्षण अन्यत्र हलविले असल्याची बाब माझ्या निदर्शनास आली. त्याबाबत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मी प्रश्न उपस्थित करून प्रशासनाला धारेवर धरले होते. पुढे हा मुद्दा हायकोर्टापर्यंत ताणला गेला. त्यामुळे शिवसेनेचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना राजीनामा द्यावा लागला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT