काटेवाडी : राज्य शासनाच्या वतीने ग्रामीण विकासाला नवे बळ देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची अंमलबजावणी बारामती तालुक्यात वेगाने सुरू आहे. या अभियानाबाबत तालुक्यातील 100 ग्रामपंचायतींना सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
सर्व ग्रामपंचायतींचा सहभाग अनिवार्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तथापि, यापैकी किमान 25 ग्रामपंचायतींचा सक्रिय सहभाग साध्य करणे हे प्राथमिक उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या अभियानाचा उद्देश मजबूत, सक्षम आणि सुशासनयुक्त स्थानिक स्वराज्य संस्था उभारणे हा आहे. यासाठी सुशासनयुक्त पंचायत-पारदर्शक कामकाज, डिजिटल व्यवहार, ग्रामसभेची सक्रियता. सक्षम पंचायत (स्वनिधी व लोकवर्गणी) - करवसुली, महसूल वाढ, जनसहभागातून निधी निर्माण. जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव - जलसंधारण, स्वच्छता उपक्रम, कचरा व्यवस्थापन, हरित उपक्रम. मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण - विविध योजना प्रभावीपणे एकत्रित करणे.
गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण - बचतगट, युवक मंडळ, समित्यांची भूमिका मजबूत करणे. उपजीविका विकास आणि सामाजिक न्याय - रोजगारनिर्मिती, वंचित घटकांसाठी कल्याणकारी उपक्रम. लोकसहभाग व श्रमदानातून लोकचळवळ - गावकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग वाढवणे. नावीन्यपूर्ण उपक्रम-डिजिटल सेवा, स्मार्ट ग्राम मॉडेल, पर्यावरणपूरक प्रकल्प.
या 8 आठ मुख्य विषयांवर आधारित उपक्रम राबविण्यात येणार आहेत. अभियानाच्या कालावधीत ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या कामकाजाची तटस्थपणे पाहणी करण्यात येणार आहे. कामाच्या निकषांनुसार गुणांकन केले जाईल व उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा यांना राज्य शासनाच्यावतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
या अभियानामुळे ग्रामीण प्रशासनाची गुणवत्ता, संसाधन व्यवस्थापन आणि लोकसहभागात सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ‘बारामती तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, उपलब्ध साधनसंपत्तींचा प्रभावी उपयोग करून गावाच्या सर्वांगीण विकासाला गती द्यावी, किमान
25 ग्रामपंचायतींनी आदर्श कामगिरी करत अभियानाच्या उद्दिष्टांची पूर्तता करावी,’ असे आवाहन केले आहे.किशोर माने, गटविकास अधिकारी, बारामती