पुणे : पुढारी वृत्तसेवा
राज्य सहकारी बँकेने आपल्या सेवकांना नफ्यातील हिस्सा मान्य करीत सेवकांना 12 टक्के आणि प्रशासनातील अधिकार्यांना 16 टक्के इतकी भरघोस वेतनवाढ दिली. अशा प्रकारे 832 अधिकारी, कर्मचार्यांना सरासरी मासिक 13 हजार 500 रुपयांप्रमाणे बँकेने एकूण वार्षिक 13.47 कोटी रुपयांचा बोजा स्वीकारला आहे.
राज्य सहकारी बँकेत विभागनिहाय सहा कर्मचारी संघटना आहेत. या सर्वांशी समन्वय साधत बँकेने केवळ 11 महिन्यांतच बँकेचा ऐतिहासिक 11 वा वेतन करार शुक्रवारी (दि. 4) बँकेच्या मुख्य सभागृहात पार पडला. यावेळी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ, बँकेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित देशमुख, विभागनिहाय 6 कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी, बँकेचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते.
बँकेच्या सेवेत कार्यरत असताना सामाजिक कार्य करणार्या राज्यातील 13 सेवकांना खास सन्मानचिन्ह देऊन यावेळी गौरविण्यात आले. करारप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आनंदराव अडसूळ यांनी या कराराचे शिल्पकार हे विद्याधर अनास्कर असल्याचे सांगून कर्मचार्यांना पगारवाढ दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
राज्य सहकारी बँकेच्या प्रगतीमध्ये सेवकांचा मोलाचा वाटा आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये दररोज होणारे बदल कर्मचार्यांनी आत्मसात करून स्पर्धेला तोंड दिले पाहिजे. 12 ते 16 टक्क्यांपर्यंत भरघोस वाढ दिल्याने बँकेच्या संपूर्ण सेवक वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
– विद्याधर अनास्कर , प्रशासक, राज्य सहकारी बँक, मुंबई.