पुणे: शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांतील 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी काढण्यात आलेल्या लॉटरीतून 1 लाख 5 हजार 582 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला आहे.
त्यात सर्वसाधारण गटातील 1 लाख 5 हजार 229, तर दिव्यांग गटातील 582 विद्यार्थ्यांचा समावेश असून, 11 ते 20 एप्रिलदरम्यान संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करता येणार आहेत, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी ही माहिती दिली.
‘आरटीई’अंतर्गत राज्यातील 8 हजार 701 शाळांतील 1 लाख 14 हजार 285 जागा प्रवेशासाठी उपलब्ध झाल्या आहेत. या जागांसाठी 2 लाख 89 हजार 385 अर्ज दाखल झाले. प्रवेशाच्या जागांपेक्षा अर्जांची संख्या जास्त असल्याने 6 एप्रिल रोजी लॉटरी काढण्यात आली. त्यातून 1 लाख 5 हजार 229 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला आहे. तर 86 हजार 34 विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी करण्यात आली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना नोंदणीकृत मोबाईलवर प्रवेशासाठी एसएमएस पाठवण्यात येणार आहेत. परंतु पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता संकेतस्थळावरून लॉटरी तपासून प्रवेशासाठी निवड झाली आहे की नाही, याची माहिती घ्यावी.
कागदपत्रांची पडताळणी गरजेची
लॉटरीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी यांच्याकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी समितीमार्फत पडताळणी करावी. पडताळणी समितीने प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी कागदपत्रांची तपासणी करून प्रमाणित केल्यानंंतर विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी ऑनलाइन प्रत उपलब्ध करून द्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.