पुणे: एमपीएससीच्या कारभाराविरोधात आंदोलन करणाऱ्या स्पर्धा परीक्षार्थींवर पोलिसांनी केलेली कारवाई अन्यायकारक असून, त्यांच्या पाठीशी वकिलांची फौज उभी करणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली. स्पर्धा परीक्षार्थींवर दाखल केलेल्या एफआयआरमध्ये चुकीची माहिती देण्यात आल्याचा आरोप करत, आंदोलनासाठी एस. एम. जोशी मार्गावर पुन्हा परवानगी देण्याची मागणीही त्यांनी केली. कोणत्याही परिस्थितीत आंदोलनाच्या ठिकाणाहून हटणार नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.
स्पर्धा परीक्षार्थींवर गंभीर स्वरूपाची कलमे लावण्यात आली असून, एफआयआर मधील दाव्यांबाबत प्रश्न उपस्थित केले पाहिजेत, असे पवार म्हणाले. ऋषी गांगुर्डे हे संबंधित ठिकाणी उपस्थित नसतानाही त्यांचे नाव एफआयआरमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. विद्यार्थ्यांना कायदेशीर मदत पुरविणार असल्याचे सांगत, पोलिसांनी केलेली कारवाई अन्यायकारक असल्याची टीका त्यांनी केली.
न्यायालयीन आदेशाचा दाखला देत पवार यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. स्पर्धा परीक्षार्थींचे म्हणणे ऐकून घेण्याची आणि त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्याची भूमिका न्यायालयाने घेतल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनासाठी परवानगी मिळावी म्हणून पोलिसांना पत्र दिले असूनही अद्याप परवानगी मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला.
एस. एम. जोशी मार्गावरच आंदोलन करण्याचा आग्रह
आंदोलनासाठी जागा बदलण्याच्या शक्यतेबाबत विचारले असता, एस. एम. जोशी मार्गावरच आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका पवार यांनी मांडली. आंदोलनासाठी यापूर्वी दि. २ ऑक्टोबर रोजी परवानगी मिळाली होती. पुणेकरांना त्रास होऊ नये, रुग्णालये आणि रहिवासी भागांना अडथळा निर्माण होऊ नये, याचा विचार करूनच या जागेची निवड केल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी यापूर्वी दिलेली परवानगी रद्द केली असली, तरी त्याच ठिकाणी पुन्हा परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
सरकार आणि पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
पवार यांनी पुणे पोलिस आयुक्तांच्या प्रतिबंधात्मक आदेशांवरही आक्षेप घेतला. आंदोलन करणाऱ्या स्पर्धा परीक्षार्थींवर कारवाई केली जात असताना अन्य ठिकाणी शस्त्रांसह फिरणाऱ्यांवर तितकीच तत्परता दाखवली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.
संविधानाच्या रक्षणासाठी आंदोलन
एमपीएससीमधील कथित गैरप्रकार आणि आयोगाच्या अध्यक्षांच्या मुद्द्यावरून सुरू असलेला लढा संविधानाच्या रक्षणासाठीही असल्याचे पवार म्हणाले. दिल्लीतील आंदोलनाला जाता येत नसल्यास नागरिकांनी पुण्यात येऊन स्पर्धा परीक्षार्थींना पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. स्पर्धा परीक्षार्थींवर जबरदस्तीने कारवाई केल्यास सामान्य नागरिक त्यांच्या पाठीशी उभे राहतील, असा इशाराही त्यांनी दिला.