राजगुरूनगर : यंदा जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात अति पावसाचा मोठा फटका भात उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यंदा 10 मे पासून सुरू झालेला पाऊस भात काढणीला आला असताना थांबायचे नाव घेत नाही. अति पाऊस, ऊन व पोषक वातावरणाचा अभाव असल्याने भाताच्या उत्पादनात थेट 50 टक्के घट झाली आहे. याचे परिणाम भविष्यात तांदळाच्या किमतीवर होणार असून, इंद्रायणीसह सर्व पारंपरिक तांदळांचे दर दुपटीने वाढू शकतात, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.(Latest Pune News)
यंदा खरीप हंभागाची सुरूवातच शेतकऱ्यांच्या नुकसानीने झाली. मे महिन्यात 10 तारखेपासून पावसाला सुरूवात झाली ती आजतागायत कायम आहे. सुरूवातीला भाताची रोपे टाकण्यासाठी अपेक्षित असा वापसा झाला नाही. भात रोपेच न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांना भात शेती पडीक ठेवण्याची वेळ आली. दरम्यान जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने लागवड होऊन शेतकऱ्यांना चांगल्या पिकांची व उत्पादनाची आशा निर्माण झाली होती. परंतु भाताची रोपे टाकल्यापासून भात लावणी झाल्यानंतर भात फुलोर्यात आल्यावर व आता काढणीच्या वेळी देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. भात पिकांना अपेक्षित असे उन व पोषक वातावरण मिळाले नाही. याचा परिणाम भाताच्या पिकावर झाला असून, भाताच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. भाता उतारा घटल्याने शेतकरी अडचणीत आला असून, खर्च देखील निघाला नाही. परंतु यामुळे यंदा तांदळाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील भाताचे आगार म्हणून जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुका ओळखला जातो. खरीप हंगामात या तिन्ही तालुक्यात आदिवासी पट्ट्यातील बहुतेक सर्व शेतकरी 100 टक्के फक्त भात शेतीच करतात. परंतु हंगमाच्या सुरूवातीपासून तर आता काढणीच्या वेळी देखील पुन्हा मुसळधार पाऊस झाल्याने भात काढणी 15 ते 20 दिवस लांबणीवर पडली.
सध्या 2 ते 3 दिवसांपासून भात काढणीला वेग आला असून, भाताच्या उत्पादनात थेट 50 टक्के घट झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
आमची भाताची तीन मोठी खाचर (वावर) आहेत. या भात खाचरांमध्ये आम्हाला दरवर्षी सरासरी 50 ते 55 पोती भाताची साळ होते. परंतु या तिन्ही खाचरामधून यंदा केवळ 22 पोती साळ झाली आहे. गेले सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा भात पिकावर मोठा परिणाम झाला असून, आमचे भाताचे उत्पादन 50 टक्क्यांहून अधिक घटले आहे. भात शेतीचा खर्च दरवर्षी वाढत असताना अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने भात उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. भात लावण्यापेक्षा विकत घेऊन खाल्लेला बरा, अशी मानसिकता होत आहे.मोहन रामचंद्र शिंदे, भात उत्पादक शेतकरी, आंबोली