.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?rect=0%2C0%2C652%2C367&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुणे : लोहगाव विमानतळ ते पुणे शहराला जोडणारा जुना विमानतळ रस्त्याचे रूपडे लवकरच पालटणार आहे. या रस्त्याचे लवकरच सुशोभीकरण व सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. महापालिका कॉर्पोरेट सामाजिक बांधिलकी (सीएसआर) अंतर्गत या रस्त्यावर आकर्षक फुलझाडे, शोभिवंत वृक्ष, लॅन्डस्केपींग आणि रंगरंगोटीची कामे करणार आहे.(Latest Pune News)
लोहगाव विमानतळावर उतरलेले प्रवासी नागपूर चाळ, येरवडा गुंजन चित्रपटगृह चौक, बंडगार्डन पूल या जुन्या विमानतळ रस्त्याने शहरात प्रवेश करतात. त्यामुळे देश-विदेशातील प्रवासी, तसेच महत्त्वाच्या आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्ती या मार्गावरून प्रवास करतात. त्यामुळे या रस्त्याचे सौंदर्य आणि स्वच्छता हे शहराच्या प्रतिमेशी थेट निगडित आहे. महापालिकेकडून पहिल्या टप्प्यात जुन्या विमानतळ रस्त्याचे सुशोभीकरण केले जाणार असून, दुसऱ्या टप्प्यात विमानतळ ‘विमाननगर’ रामवाडी -येरवडा या नवीन विमानतळ रस्त्याचा समावेश असेल.
या पहिल्या टप्प्यातील कामासाठी उद्योजक अतुल चोरडिया यांनी ‘सीएसआर’च्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. महापालिकेने या कामासाठी शहर सौंदर्यीकरण क्षेत्रातील तज्ज्ञाची नेमणूक केली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार रस्त्याच्या दोन्ही बाजूंना आकर्षक फुलांची लागवड, लॅन्डस्केपींग, शोभिवंत रंगसंगती व स्वच्छता सुधारणा केली जाणार आहे. या कामाला डिसेंबर महिन्यापासून सुरुवात होईल, अशी माहिती महापालिकेचे पथ विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.
विमानतळ रस्त्याच्या सुशोभीकरणावर भर दिला जाणार आहे. सीएसआरच्या माध्यमातून हे काम केले जाणार असून, त्यामुळे रस्त्याच्या सौंदर्यात लक्षणीय भर पडेल. लवकरच या कामाला सुरुवात होईल.
नवल किशोर राम, आयुक्त महापालिका