कोंडीभाऊ पाचारणे
खेड: तालुक्यातील रेटवडी-वाफगाव जिल्हा परिषद गटात सर्वसाधारण महिला जागेसाठी प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. निवडणुकीची घो षणा होण्याआधी सर्वच इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात जनसंपर्कात मोठी आघाडी घेतली आहे. या गटात घड्याळासाठी स्पर्धा, मशालीचा उमेदवार ठरल्यात जमा असून धनुष्यबाणाच्या उमेदवारीची उत्सुकता मतदारांना लागली आहे. (Latest Pune News)
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून माजी सदस्या डॉ. रोहिणीताई राक्षे आणि राजगुरुनगर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अश्विनीताई पाचारणे यांच्यात उमेदवारीसाठी प्रचंड चुरस सुरू आहे. याशिवाय या पक्षातून आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे समर्थक आणि राजगुरुनगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष गणेश थिगळे यांच्या पत्नी रोहिणीताई थिगळे, मांजरेवाडीच्या सरपंच अनिता मांजरे यांनीही उमेदवारी मागितली आहे. उमेदवारी आपल्यालाच मिळणार असे सर्व उमेदवार सांगत आहेत; मात्र स्पर्धेमुळे या तीनपैकी एक उमेदवार मार्ग बदलणार असल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख यांच्याबरोबर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत 'त्या' उमेदवाराचा लवकरच प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान शिवसेना (उबाठा) कडून खरपुडी गावच्या दीप्ती भोगाडे या एकमेव इच्छुक आहेत. विशेष म्हणजे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक झालेल्या जयसिंग भोगाडे यांच्या त्या सूनबाई आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर भोगाडे यांनी मोहिते पाटील यांची साथ सोडून आमदार बाबाजी काळे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला असून सध्या त्या एकमेव इच्छुक पक्षाकडून दिसत आहे.
रेटवडी-वाफगाव गटात रेटवडी आणि वाफगाव असे दोन भाग आहेत. भीमा नदीच्या काठावर वसलेली संपन्न आणि मोठ्या मतदानाची गावे रेटवडी परिसरात आहेत. जिल्हा परिषदेचे इच्छुक उमेदवार देखील याच परिसरातील आहेत. तर पठार भाग असलेला वाफगाव परिसर हा अवर्षणग्रस्त भाग आहे. फेब्रुवारी महिन्यात येथे अनेक गाव, वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे लागतात. कळमोडी व चासकमान धरणात सिंचन प्रकल्प राबवून आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागातून वेळ नदीवर बंधारे बांधून वाफगाव परिसरात पाणी आणण्याचे धोरण आहे; मात्र अनेक वर्ष नुसत्या घोषणांचा पाऊस येथील जनतेने पाहिला आहे. गोसासी, निमगाव खंडोबा परिसरात सेझ प्रकल्प आहे. परंतु येथील कंपन्यांमध्ये स्थानिकांना नोकऱ्या किंवा काम मिळत नाही. खून, मारामाऱ्या होतात; मात्र न्याय मिळत नसल्याची भावना युवा वर्गात आहे.
निमगाव खंडोबा, गुळाणी येथील सटवाजी बाबा आणि तुकईवाडी येथील तुकाइमाता मंदिर परिसरात भाविकांची गर्दी असते. सण, उत्सव काळात अनेक उणिवा, समस्यांचा सामना करावा लागतो. सर्वच ठिकाणी देवस्थान समितीमध्ये वाद आहेत. रेटवडी परिसरात रब्बी हंगामात कांदा तर वाफगावच्या पठार भागात खरिपात बटाटा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. नियमितपणे रस्त्यांची दूरवस्था असल्याने पिकवलेला माल बाजारात नेताना शेतकऱ्यांचे हाल होतात. अशा विविध प्रकारच्या प्रश्नांसाठी पठार भागात मोठी नाराजी आहे. ती सत्ताधारी म्हणून माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आणि स्थानिक आमदार म्हणून बाबाजी काळे समर्थक उमेदवारांना त्रासदायक ठरणार आहे.
वाफगाव पंचायत समिती गणात सर्वसाधारण जागेसाठी राष्ट्रवादीकडून सातकरस्थळचे माजी सरपंच अजय चव्हाण, शिवसेनेकडून माजी सरपंच मारुती सातकर यांचे चिरंजीव अतुल सातकर, वैभव गावडे, गुळाणीचे ज्ञानेश्वर ढेरंगे, संतोष गार्डी इच्छुक आहेत.
रेटबडी गणात राजगुरुनगर वकील बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. देविदास शिंदे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून इच्छुक आहेत. अजित पवार गटाकडून प्रा. बापूसाहेब चौधरी उमेदवारी घेण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्यासह सातकरस्थळचे माजी उपसरपंच मयुर जगदाळे, बरुडेचे सुहास तांबे आणि अमर बोऱ्हाडे देखील इच्छुक आहेत. किरण पवार, दिलीप दुबे, खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष आनंदा काळे, राक्षेवाडी येथील दत्ता कोकणे जनसंपर्कात आहेत.