पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : शहरात येत्या गुरुवारी (दि.28) अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर श्रीगणेश विसर्जन होते. त्यासाठी वाजतगाजत मिरवणुका काढल्या जातात. विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडावी, म्हणून या मार्गावरील रस्त्यावरील अडथळे तसेच, अतिक्रमणे दूर करावीत, अशा तक्रारी महापालिकेच्या जनसंवाद सभेत नागरिकांनी केल्या. तसेच, प्रशासनाच्या संथगती कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात आली. सभा सोमवारी (दि. 25) सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयात झाली. सभेला एकूण 35 नागरिकांनी सहभाग घेऊन 50 हून अधिक विविध तक्रारी केल्या.
शहरात नवव्या दिवशी (दि.27) आणि दहाव्या दिवशी (दि. 28) गणेश मूर्तीचे मोठ्या प्रमाणात विसर्जन केले जाते. नदी घाटापर्यंत वाजतगाजत मिरवणुका काढल्या जातात. मात्र, पावसामुळे अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. तसेच, मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढल्याने मिरवणुकीस अडथळे निर्माण होतात. त्यामुळे वादावादीचे प्रसंग निर्माण होतात. विसर्जन मिरवणूक सोहळा व्यवस्थितपणे पार पडावा, म्हणून महापालिका प्रशासनाने विसर्जन मार्गावरील सर्व खड्डे बुजवून डागडुजी करावी. अतिक्रमण हटवावीत, अशी तक्रार सभेत अनेक नागरिकांनी केली.
तसेच, पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्याने वाहनचालकांसह नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा म्हणून व्यवस्था करावी. रस्ते व ड्रेनेज लाइन दुरुस्त कराव्यात. पाणीपुरवठा योग्य दाबाने करावा. शहरात वाढणार्या रहदारीचे योग्य नियोजन करावे, आदी तक्रारी नागरिकांनी केल्या.
सभेच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, मनोज सेठिया, संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, अजय चारठाणकर यांनी भूषवले. यावेळी क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, अण्णा बोदडे, किरणकुमार मोरे, राजेश आगळे, सीताराम बहुरे, शीतल वाकडे, उमेश ढाकणे व अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा