

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड शहरात अपघातामध्ये कुत्री, मांजरे व इतर जनावरे जखमी होऊन रस्त्यावर पडलेले असतात. त्यात जखमी जनावरांना वेळीच उपचार न मिळाल्याने उपचाराअभावी ते मरण पावतात. हे प्रकार घडू नये म्हणून महापालिकेने नेहरूनगर, पिंपरी येथे प्राणी सुश्रुषा केंद्र (अॅनिमल शेल्टर) सुरू केले आहे. भटक्या जखमी जनावरांवर उपचार करण्यासाठी महापालिकेने पीपल फॉर अॅनिमल या खासगी संस्थेची नेमणूक केली असून, त्यावर दरमहा 80 हजारांचा खर्च होत आहे.
शहरात मोठ्या संख्येने भटकी व मोकाट कुत्री तसेच जनावरे आहेत. कुर्त्यांनी चावा घेतला. तसेच, वाहतुकीस अडथळा अशा अनेक तक्रारी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागास प्राप्त होतात. कुत्रे किंवा जनावरास इजा होणे. अपघातात गंभीर जखमी होणे. अतिसार व उलटी तसेच, इतर गंभीर आजारी जनावरांबाबत तक्रारी येतात. अशा जखमी व आजारी जनावरांवर या केंद्रात तातडीने उपचार केले जातात. अशा कुत्र्यांच्या उपचारासाठी तेथे आयपीडी आणि ओपोडी सुरू आहे.
पीपल फॉर अॅनिमल संस्था आजारी व जखमी जनावरांची काळजी घेऊन त्यावर उपचार करते. बरे झाल्यानंतर त्या जनावरास पुन्हा त्या ठिकाणी सोडून दिले जाते. त्यासाठी महापालिकेने केंद्रात पिंजरे व सोई-सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्युत व पाणीपुरवठा सुविधा दिली आहे. सुरक्षेसाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. डॉग कॅचिंग व्हॅन, वाहनचालक उपलब्ध करून दिले आहेत. तसेच, आवश्यक त्या लसीचे डोस महापालिकेकडून उपलब्ध करून दिले जातात. जैविक कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेची यंत्रणा आहे. शस्त्रक्रिया कक्षात आवश्यक साहित्य पालिकेकडून पुरविण्यात आले आहे.
संबंधित संस्था जखमी जनावरांवर उपचार करते. त्यासाठी आवश्यक संख्येने डॉक्टर व मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. याठिकाणी मांजराची नसबंदी शस्त्रक्रिया केली जाते. जखमी जनावरांवर उपचार केल्यानंतर ते आणलेल्या जागी नेऊन सोडले जातात. कुत्री व मांजर दत्तक कार्यक्रम राबविण्यासाठी संस्था काम करीत आहे. प्राप्त तक्रारींवर कारवाई करण्यासाठी संस्थेने एक समन्वयक नेमला आहे.
जखमी जनावरांवर उपचार केल्याबद्दल महापालिका त्या एजन्सीला दरमहा 80 हजार रुपये शुल्क देत आहे. हे कामकाज तीन वर्षे चालणार आहे. या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समिती तसेच, सर्वसाधारण सभेची मान्यता दिली आहे.
जखमी कुत्रे व मांजरांवर तातडीने उपचार व्हावेत म्हणून महापालिकेने नेहरूनगर येथे अॅनिमल शेल्टर आहे तेथे पाळीव तसेच, भटक्या व मोकाट अशा जखमी आणि आजारी कुत्री व मांजरांवर उपचार केले जातात. उपचारानंतर बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा आणलेल्या जागी सोडले दिले जाते. कुत्री व मांजर दत्तक घेण्यासाठी कोणी पुढे आल्यास त्यांना ते जनावर दिले जाते. शहरात कोणाला जखमी जनावर आढल्यास 7028714111 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी केले आहे.
हेही वाचा