पुणे

आरसी बुक, परवाना स्मार्ट कार्ड छपाई पुण्यातच : परिवहन आयुक्त विवेक भिमनवार

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यात होणाऱ्या आरसी बुक, परवाना स्मार्ट कार्ड छपाई संदर्भात पुण्याला वगळले आहे, ही माहिती चुकीची आहे. नागपूर, पुणे, मुंबई ही तीन नावे कंपनीने आम्हाला कळवली आहेत. त्यानंतर ठिकाणांच्या बदलाबाबतची कोणतीही माहिती माझ्यापर्यंत नाही, असे परिवहन आयुक्त विवेक भिमानवार यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले. आरसी बुक परवान्याचे स्मार्ट कार्ड छपाई करणाऱ्या हैदराबाद येथील 'रोझ मार्टा' या कंपनीचा परिवहन विभागाशी असलेला करार मागील काही महिन्यापूर्वी संपुष्टात आला आहे.

त्यामुळे परिवहन विभागाने कर्नाटक येथील 'मणिपाल' कंपनीशी करार केला आहे. येत्या 1 ऑगस्टपासून ही सेवा सुरू होणार आहे. त्याकरता परिवहन विभागाने राज्यभरात स्मार्ट कार्डचे वाटप भौगोलिक दृष्ट्या सोयीस्कर होईल अशी तीन ठिकाणी निवडली आहेत. यात पुणे मुंबई आणि नागपूर या तीन ठिकाणांचा समावेश आहे. मात्र यात पुण्याला वगळून छत्रपती संभाजी नगर हे नाव सहभागी केल्याची जोरदार चर्चा परिवहन विभागाच्या वर्तुळात सुरू होती.

या संदर्भात परिवहन आयुक्त भीमनवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पुण्याला वगळल्याची माहिती चुकीची असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, ठिकाणांमध्ये बदल केलेली माहिती माझ्यापर्यंत आलेली नाही. आम्ही कंपनीला कंत्राट दिले आहे. कंपनीनेही तसे आम्हाला काही कळवले नाही. पूर्वीच सांगितलेल्या तीन ठिकाणांबद्दलच आम्हाला माहिती आहे, असे ते यावेळी म्हणाले.

या संदर्भात महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे अध्यक्ष राजू घाटोळे म्हणाले, मागील दोन-तीन आठवड्यापूर्वी कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी स्मार्ट कार्ड संदर्भात पुणे आरटीओला भेट दिली होती. त्यावेळी पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी स्मार्ट कार्डच्या कंपनीला पुणे आरटीओ कार्यालयात जागा दिली असल्याचे सांगितले होते.

तसेच, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी देखील पुणे आरटीओत येऊन या जागेची पाहणी केली असल्याचे देखील डॉ. शिंदे यांनी यावेळी सांगितले होते. मग परिवहन विभाग अचानक ठिकाण कसे काय बदलत आहे. आमच्यापर्यंत अशी कोणतीही माहिती आलेली नाही. परिवहन विभागाने स्मार्ट कार्डसाठी पुणे शहराला निश्चित करावे. यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर म्हणाले, पुण्याचे ठिकाण बदलले आहे, याबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही, मुंबईला वरिष्ठ पातळीवर काय निर्णय झाला, याची माहिती घ्यावी लागेल.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT