पुण्यातील सुतारदर्‍याची इर्शाळवाडी होण्याची भीती !

पुण्यातील सुतारदर्‍याची इर्शाळवाडी होण्याची भीती !

दीपक पाटील

पौड रोड(पुणे) : कोथरूड परिसरातील राजमाता जिजाऊनगर (सुतारदरा) डोंगरपायथ्यशी वसलेले आहे. काही वर्षांपूर्वी या ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीत काही घरे वाहून गेली होती. त्यानंतरदेखील महापालिका प्रशासनाचे या भागात आवश्यक उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे माळीण किंवा इर्शाळवाडी येथील दुर्घटनेसारखी आपत्ती या ठिकाणीदेखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरात डोंगरउतारावर बांधलेली घरे धोकादायक आहेत.

सुतारदरा परिसर हा सुमारे 15 हजार लोकवस्तीचा भाग आहे. रहिवाशांनी मिळेल त्या जागी डोंगरउतारावर घरे बांधली आहेत. काही वर्षांपूर्वी जोरदार पावसामुळे या ठिकाणी असलेली काही घरे वाहून गेली होती. तसेच पाण्याच्या टाकीजवळ घराची भिंत व डोंगरावरून वाहून आलेल्या राडारोड्यामध्ये एक तरुण दाबला गेला होता. परंतु, सुदैवाने त्याला वाचवण्यात यश आले होते. महापालिकेने अनधिकृत बांधकामावर नियंत्रण न ठेवल्याने डोंगरउतारावर घरांची दाटी झाल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास जागाच उरली नाही. तसेच पाण्याचे नैसर्गिक प्रवाह अडविण्यात आले आहेत.

अतिवृष्टी झाल्यास शिवशाहीनगरमधील पाण्याच्या टाकीच्या परिसरातील काही घरांना धोका पोहचू शकतो. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याची मागणी नागरिकांनी केली होती. परंतु, ही जागा खासगी मालकीची असल्याने महापालिकेला तेथे बांधकाम करता आले नाही. प्रशासनाने अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी नियमाची पायमल्ली करत डोंगरउतारावर घरे बांधल्याने या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीचा धोका नाकारता येत नसल्याचे पर्यावरण तज्ज्ञांनी सांगितले.

पर्यावरणाकडे दुर्लक्ष नको !

पर्यावरण तज्ज्ञ नरेंद्र शिंदेकर म्हणाले की, निसर्गाकडून आपण फक्त घेत असतो. मात्र, पर्यावरणाच्या संवर्धनाकडे माणसाचे सध्या दुर्लक्ष होत आहे. यातूनच आपण नैसर्गिक आपत्तींना निमंत्रण देत असतो. माळीणसारख्या दुर्घटनेतून आपण काही शिकलो, असे वाटत नाही. या आपत्ती टाळण्यासाठी डोंगराळ भागात होत असलेले उत्खनन आणि बांधकामे थांबली पाहिजेत. मानवाने पर्यावरणावर आघात केल्याने नैसर्गिक आपत्ती निर्माण होत आहेत.

पावसाळा सुरू झाला की, मनात भीतीचे वातावरण निर्माण होते. कारण, जोरदार पाऊस पडल्यावर डोंगर भागातून आमच्या घरालगत दगडी, माती वाहून येते. अनेक वेळा आमच्या घरात पाणीदेखील शिरल्याने नुकसानीला समोर जावे लागले आहे.

– नीलिमा भोसले, रहिवासी.

राजमाता जिजाऊनगर येथे टेकडीलगत भूस्खलनाचा धोका नाकारता येत नाही. इर्शाळवाडी येथील नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील डोंगरउतारावर असणार्‍या घरांची पाहणी करून प्रशासनाने तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.

– संतोष डोख, रहिवासी

सुतारदरा परिसरातील डोंगर भागात काही नागरिकांची स्वतःची सात-बारा असलेली जागा असून, त्यांनी त्यावर घरे बांधली आहेत. मात्र, संभाव्य नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी मुख्य खात्याशी बोलून आवश्यक त्या उपाययोजना आगामी काळात केल्या जातील.

– केदार वझे,
सहायक आयुक्त, कोथरूड क्षेत्रीय कार्यालय

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news