तापमानात योग्य बदल करणारे ‘एआय बेड’ | पुढारी

तापमानात योग्य बदल करणारे ‘एआय बेड’

न्यूयॉर्क ः नवी ठिकाणे पाहण्यासाठीच नव्हे तर विश्रांतीसाठीही अनेक लोक पर्यटनासाठी बाहेर पडत असतात. चांगली झोप आणि निवांतपणा मिळावा असा त्यांचा हेतू असतो. अशा ‘स्लीप टुरिझम’चा ट्रेंडही सध्या वाढत आहे. त्यामुळे मोठे हॉटेल्स आणि रिसॉर्टस् या ट्रेंडला अनुसरून काही नव्या सुधारणा करीत आहेत. आता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) च्या मदतीने एक अशी सिस्टीम बनवण्यात आली आहे जी तापमान नि यंत्रित करू शकेल. त्यामध्ये अशा ‘एआय बेड’चा समावेश आहे जो झोपणार्‍या व्यक्तीच्या शरीराला अनुकूल अशा पद्धतीने तापमानात बदल करील.

या सिस्टीममध्ये आपण येताच हॉटेल रूमचे तापमान आपोआप ‘अ‍ॅडजस्ट’ होईल. बेडवरील गादी वेळोवेळी तापमान बदलत राहील. मल्टिसेन्सर टेक्नॉलॉजीच्या मदतीने झोप चांगली येण्यास मदत होईल. लोकांना पुरेशी आणि गाढ झोप मिळावी व ते जागे झाल्यावर ताजेतवाने व्हावेत यासाठी या सुविधा दिल्या जात आहेत. ‘रेस्टोरेटिव्ह बेड’ हे असेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सने नियंत्रित आणि स्लीप सायन्सला अनुसरून बनवलेले बेड आहेत जे व्यक्तीच्या गरजेनुसार रियल टाईममध्ये तापमान एडजस्ट करतील. न्यूयॉर्कच्या पार्क हयात हॉटेलमध्ये ही सुविधा आहे. या बेडस्वर स्मार्ट आणि प्रेशर रिलीज मॅट्रेस म्हणजेच गाद्या असतात.

त्यामध्ये सावधगिरीने डिझाईन केलेले एअर पॉकेट असतात जे शरीराच्या मुख्य दबाव बिंदूंवरील दाब कमी करतात. याशिवाय मल्टिसेन्सर टेक्नॉलॉजी रात्रभर बेडला शरीराच्या अनुरूप ठेवण्यास मदत करते. ग्राहक मोबाईलच्या मदतीने आपल्या प्राधान्याच्या गोष्टी निश्चित करू शकतो. लॉस एंजिल्समधील फिगुएरोआ हॉटेल तर ग्राहकांच्या ब्लँकेटविषयीच्या आवडी-निवडी जाणून घेण्यासाठी दोन किंवा तीन आठवड्यांपूर्वीच सर्व्हे फॉर्म पाठवते. काही हॉटेल्स ग्राहकांच्या गरजेनुसार उशाही बनवू लागले आहेत.

Back to top button