प्रभाग क्रमांक : 23
गणेश खळदकर
प्रभागातील आरक्षण
‘अ’ गट : अनुसूचित जाती प्रवर्ग
‘ब’ गट : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
‘क’ गट : सर्वसाधारण प्रवर्ग (महिला)
‘ड’ गट : सर्वसाधारण प्रवर्ग
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तिघांना साथ देणाऱ्या रविवार पेठ-नाना पेठ प्रभागातील राजकीय समीकरणे आता बदलली आहेत. प्रभागात शत-प्रतिशत भाजप हा नारा घेऊन भाजपने व्यूहरचना केली आहे. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि दोन्ही शिवसेना यांचीही ताकद असल्याने या प्रभागात निवडणूक रंगतदार होणार आहे. त्यातच सर्वसाधारण खुल्या गटासाठी एकच जागा असल्याने त्यासाठी इच्छुकांमध्ये उमेदवारीसाठी ‘कांटे की टक्कर’ होणार आहे.
रविवार पेठ-नाना पेठ या प्रभागाची एकूण लोकसंख्या 76 हजार 984 इतकी असून, यात अनुसूचित जाती प्रवर्ग 9 हजार 513 आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील 327 नागरिकांचा समावेश आहे. दाट लोकवस्ती असलेला हा प्रभाग असून, या भागात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने आगामी निवडणुकीत हा महत्त्वाचा मुद्द ठरणार आहे. अनुसूचित जाती प्रवर्गाची लोकसंख्या नऊ हजारांपेक्षा जास्त असल्याने या प्रभागात आगामी निवडणुकीसाठी अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण आहे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन समुदायासह अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गासह सर्वधर्मिय नागरिक या प्रभागात आहेत. मात्र, नागरिक धार्मिक किंवा जातीय राजकारणाऐवजी विकासाच्या बाजूने कौल देत असल्याचे गेल्या काळातील निवडणुकांत दिसून आले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत या प्रभागाचा सर्वच राजकीय पक्षांचा कस लागणार आहे.
या प्रभागात महापालिकेच्या 2017 मधील निवडणुकीत सर्वसाधारण प्रवर्गासाठी दोन जागा होत्या. तसेच सर्वसाधारण प्रवर्ग (महिला) आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), असे आरक्षण होते. परंतु आगामी निवडणुकीसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी (ड गट) केवळ एकच जागा आहे. या जागेसाठी खऱ्या अर्थाने ‘कांटे की टक्कर’ होणार असून, इच्छुकांची संख्या मोठी असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष स्वतंत्र निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या 2017 मधील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वनराज आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, भाजपच्या सुलोचना कोंढरे आणि शिवसेनेचे विशाल धनवडे हे निवडून आले होते. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची काही वर्षांपूर्वी हत्या झाली आहे. तसेच आयुष कोमकर खूनप्रकरणात माजी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर या तुरुंगात आहेत. त्यांना निवडणूक लढविण्यास न्यायालयाने नुकतीच परवानगी दिली आहे. त्यामुळे लक्ष्मी आंदेकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? याबाबत नागरिकांत चर्चा सुरू आहे. माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी गतवर्षी भाजपमध्ये प्रवेश केल्याने ते आता भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. तर प्रकृतीच्या कारणामुळे माजी नगरसेविका सुलोचना कोंढरे निवडणूक लढविणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे.
काँग्रेसकडून वीरेंद्र किराड इच्छुक आहेत. शिवसेनेकडून (ठाकरे गट) संजय मोरे, शिवसेना (शिंदे गट) माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ॲड. शिवराज माळवदकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) आनंद सागरे हे रिंगणात उतणार आहेत. तसेच अपक्ष इच्छुकांकडूनही निवडणुकीची तयारी सुरू आहे.
एकंदरीतकच या सर्वच राजकीय पक्षांची ताकद आहे. त्यामुळे हा प्रभाग कोणत्याही एका पक्षाला संधी न देता पुन्हा संमिश्र निकाल देईल अशा पद्धतीची चर्चा आहे.