Ramzan and Ash Wednesday Pudhari
पुणे

Ramzan and Ash Wednesday: पुण्यात रमजानला उत्साहात सुरुवात; ख्रिश्चन बांधवांचाही 40 दिवसांचा उपवास प्रारंभ

मशिदींमध्ये नमाज, इफ्तार स्टॉल्सची लगबग; चर्चमध्ये विशेष प्रार्थना आणि ‘राखेचा बुधवार’ निमित्त श्रद्धाभाव

पुढारी वृत्तसेवा

रमजानच्या पवित्र महिन्याला सुरुवात

पुणे : मुस्लीम समाजबांधवांनी एकत्र येऊन केलेले नमाजपठण... दिवसभर केलेला रोजा (उपवास)... सायंकाळनंतर रोजा इफ्तार अन्‌‍ घरोघरी संचारलेला आनंद...असे उत्साही आणि आनंदी वातावरण रमजानच्या निमित्ताने शहर आणि उपनगरांत पाहायला मिळाले. पवित्र रमजानच्या महिन्याला गुरुवारपासून (दि. 19) उत्साहात सुरुवात झाली. मुस्लीम समाजबांधवांनी दिवसभर रोजा केला अन्‌‍ नमाजपठणही केले. सकाळपासून घरांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. मुस्लीमबांधवांनी मशिदीमध्ये सामुदायिक नमाजपठण केले, तर काहींनी घरातच नमाजपठण केले. रमजानच्या निमित्ताने शुक्रवार पेठ, कॅम्प परिसर, रविवार पेठ, कोंढवा आदी ठिकाणी खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावायलाही सुरुवात झाली.

मुस्लीमधर्मीयांमध्ये ‌’रमजान‌’च्या महिन्याला विशेष महत्त्व आहे. मनातील कटुता विसरून परस्परांमध्ये आपुलकी, स्नेहभाव, संयम, त्याग, शांती, सहिष्णुता वाढावी याची शिकवण देणारा हा महिना आहे. संपूर्ण महिनाभर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कडकडीत रोजे, पाच वेळा नियमितपणे नमाजपठण केले जाते. पहाटे सेहरी, दिवसभर रोजा, नमाजपठण आणि सायकाळनंतर रोजा इफ्तार करण्यात आला.

मशिदींमध्येही मुस्लीम समाजबांधवांनी एकत्र येऊन नमाजपठण केले. रमजानच्या पवित्र महिन्याला सुरुवात झाल्याने सेहरी आणि रोजा इफ्तारसाठी आवश्यक असलेल्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्स ठिकठिकाणी लावण्यात येत आहेत. खजूरसह सरबत, सुका मेवा आदी पदार्थांचे स्टॉल्स शुक्रवार पेठ, कॅम्प परिसर, रविवार पेठ, कोंढवा आदी ठिकाणी लावण्यात येत असून, काही ठिकाणी खाद्यपदार्थांच्या खरेदीला गुरुवारपासून सुरुवात झाली.

ख्रिश्चन बांधवांच्या 40 दिवसांच्या उपवासाला प्रारंभ

पुणे : चर्चमध्ये झालेली विशेष प्रार्थना, प्रार्थनेत मोठ्या संख्येने सहभागी झालेले ख्रिश्चन समाजबांधव, तरुण अन् लहान मुलांच्या गटाने सादर केलेली भक्तिगीते. असे वातावरण पाहायला मिळाले ते शहरातील विविध चर्चमध्ये. गुड फायडेच्या 40 दिवस अगोदर येणारा ॲश वेन्स्डे अर्थात राखेचा बुधवार हा ख्रिश्चनबांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवसापासून ख्रिश्चन समाजबांधवांच्या 40 दिवसांच्या उपवासाला सुरुवात होते. बुधवारपासून (दि. 18) उपवास काळाला सुरुवात झाली. यानिमित्ताने शहरातील विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थनेचे आयोजन केले होते.

ख्रिश्चन समाजबांधवांच्या उपवासाच्या पहिल्या दिवसाला राखेचा बुधवार असे म्हणतात. या दिवसापासून रोमन कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंटपंथीय ख्रिश्चन समाजबांधवांच्या 40 दिवसांच्या उपवासाला सुरुवात होते. उपवासाच्या 40 दिवसांत कोणतेही धार्मिक उत्सव साजरे केले जात नाहीत. प्रत्येक बांधव या काळात प्रभू येशू यांची उपासना करतात. आपापल्या पद्धतीने प्रार्थना, मनन, चिंतन आणि उपवास करतात. आत्मपरीक्षण आणि चिंतन यावर भर दिला जातो. सकाळी-सायंकाळी चर्चमध्ये विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात येते.

बुधवारी (दि.18) उपवासाला सुरुवात झाली आणि यानिमित्ताने घरोघरी आणि शहरातील विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थना झाली. त्यात समाजबांधवांनी सहभागी होत प्रार्थना केली. शंकरशेठ रस्त्यावरील शिलोह चर्च ऑफ ख्राईस्टचे रेव्हरंड रॉबिन महाडकर म्हणाले, 40 दिवसांच्या उपवासाला बुधवारपासून सुरुवात झाली असून, यानिमित्ताने चर्चमध्ये विशेष प्रार्थना झाली. उपवासाच्या काळात चर्चमध्ये विविध कार्यक्रमही आयोजित केले आहेत.

प्रेम आणि सेवाभाव जपण्याचा काळ

गुरुवार पेठेतील चर्च ऑफ द होली नेमचे सदस्य सुधीर चांदेकर म्हणाले, एखाद्या संकल्पाच्या पूर्तीसाठी किंवा झालेली चूक सुधारण्यासाठी प्रायश्चित म्हणून काही बांधव निरंकार उपवास करतात, तर काहीजण रविवारी उपवास सोडतात. हा काळ प्रेम आणि सेवाभाव जपण्याचा काळ आहे. बांधव आपापल्या पद्धतीने प्रार्थना, नमन, चिंतन करतात. गरजू व्यक्तींना मदत करूनच उपवासाची खरी पूर्तता होते. तसेच उपवासकाळात आम्ही गरजू आणि आजारी व्यक्तींना मदत करणार आहोत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT