

कोरेगाव भीमा : श्रीक्षेत्र तुळापूर (ता. हवेली) व श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील भूमी ही धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजेंच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. औरंग्याने श्रीक्षेत्र तुळापूर (ता. हवेली) येथील त्रिवेणी संगमावर शंभूराजेंवर दररोज एक-एक करून हल्ला केला. सुमारे 40 दिवस शंभू महाराजांनी औरंगजेबाच्या क्रूरतेचा आणि निर्दयतेचा धैर्याने आणि शौर्याने सामना केल्याने शंभूभक्त दर वर्षी शंभूराजांचा त्याग आणि त्यांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी बलिदान मास पाळतात. या मासाला प्रारंभ झाला आहे.
यावर्षी धर्मवीर बलिदान मास बुधवार (दि. 18) पासून सुरू झाला असून, तो 18 मार्चपर्यंत पाळला जाणार आहे. या बलिदान मासाच्या महिन्यात धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करण्यासाठी श्रीक्षेत्र तुळापूर व वढू बुद्रुक येथे दररोज सायंकाळी शंभूराजेंच्या समाधिस्थळी श्रद्धांजली सभा आयोजित केली जाते.
शंभू महाराजांचे समाधिस्थळ दररोज आकर्षक फुलांनी सजविले जाते. रक्तदान शिबिर व सामूहिक मुंडण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. शंभूराजेंच्या पुण्यतिथीदिनी संपूर्ण राज्यभरातून हजारोंच्या संख्येने शंभूभक्त तुळापूर व वढू बुद्रुक येथील शंभूराजेंच्या समाधिस्थळी नतमस्तक होऊन त्यांना श्रद्धांजली अर्पित करतात.
या वर्षी धर्मवीर बलिदान मासमध्ये जास्तीत जास्त शंभूभक्त सहभागी होणार आहे. हा आकडा दरवर्षी कित्येक पटींनी वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.