क्रीडागणांची दुरवस्था, अतिक्रमणे, वाहतूक कोंडी ‌"जैसे थे‌' Pudhari
पुणे

Ramtekdi Civic Issues: क्रीडागणांची दुरवस्था, अतिक्रमणे, वाहतूक कोंडी ‌"जैसे थे‌'

रामटेकडी–वैदूवाडी–माळवाडी प्रभागातील क्रीडा सुविधा बंद, वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते आणि अतिक्रमणांमुळे नागरिक त्रस्त; समस्यांना 'जैसे थे' स्थिती

पुढारी वृत्तसेवा

प्रभाग क्रमांक : 17 रामटेकडी-वैदूवाडी-माळवाडी

प्रमोद गिरी, नितीन वाबळे

प्रभाग क्रमांक 17 मध्ये रामटेकडी, वैदूवाडी आणि माळवाडी भागाचा समावेश आहे. गेल्या काळात परिसरात विविध विकासकामे केल्याचे दावे माजी नगरसेवकांकडून केले जात आहेत. मात्र, प्रभागातील कै. रामचंद्र बनकर क्रीडांगणाची दुरवस्था झाली असून, अमर कॉटेज परिसरातील क्लब, स्वीमिंग पूल, क्रीडांगणही बंद अवस्थेत आहे. रस्त्यांवरील अतिक्रमणे, वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था, रस्ते आणि कालव्यात टाकला जाणारा कचरा, अवैध बांधकामे आदींसह विविध समस्या कायम असल्याचे नागरिकांनी सांगितले.

माळवाडी परिसरात अतिक्रमणे, अरुंद रस्ते, अवैध बांधकामांसह विविध समस्या आहेत. या भागातील शाळा आणि महाविद्यालयांत सुमारे तीस ते पस्तीस हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास नेहमीच सहन करावा लागत आहे. अनधिकृत पथारी व्यावसायिकांसह हॉटेल व्यावसायिकांनी रस्त्यांवर अतिक्रमण केल्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे.

मगरपट्टा परिसरातील रस्ते अरुंद असल्याने या भागात वाहतूक कोंडीची समस्या आता नित्याचीच झाली आहे. या भागात महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेला क्लब बंद अवस्थेत आहे. याबाबत अनेकवेळा प्रशासनाकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच, आरक्षित असलेली सुमारे तीन एकर जागा अद्यापही पडून असून, हे ठिकाण मद्यपींचा अड्डा बनले आहे. पारिजात सीरम कॉलनीसमोरील भागाचाही या प्रभागात समावेश असून, परिसरातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. रामटेकडी झोपडपट्टी व रामटेकडी औद्योगिक वसाहतीचा या प्रभागात समावेश आहे. मागील काही वर्षांपासून या भागातील नागरी समस्या ‘जैसे थे‌’ असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सोलापूर रस्ता परिसरातील रामटेकडी चौकापासून ते रेल्वे गेटशेजारील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे उद्यानापर्यंतचा मुख्य रस्ता अरुंद आहे. या रस्त्यावर पाण्याचे टँकर आणि औद्योगिक वसाहतीमधील अवजड वाहनांची सतत वर्दळ असते.

या रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे असून, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रामटेकडी येथील एसआरए प्रकल्पात स्थानिक नागरिकांना घरे मंजूर झाली आहेत. मात्र, इमारतीचे काम संथगतीने सुरू असल्याने नागरिक गेल्या दहा वर्षांपेक्षा जास्त काळापासून घर मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

ड्रेनेजलाइनची दुरवस्था झाल्याने सांडपाणी उघड्यावरून वाहण्याची समस्या उद्भवत आहे. तसेच, पावसाळी वाहिन्या अपूर्णावस्थेत असल्याने पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी तुंबत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रभागात अनेक समस्या कायम असल्याने नागरिकांनी माजी लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

प्रभागातील प्रमुख समस्या

कै. रामचंद्र बनकर क्रीडांगणाची दुरवस्था

अमर कॉटेज परिसरातील क्लब, स्वीमिंग पूल, क्रीडांगण बंद अवस्थेत.

मगरपट्टा-मुंढवा रस्त्यावरील अतिक्रमणे आणि वाहतूक कोंडी.

माळवाडी येथील जुन्या कालव्यामध्ये टाकण्यात आलेला राडारोडा.

मगरपट्टा चौकापासून मुंढवा येथील नदीपात्राकडे जाणाऱ्या ओढ्यातील पाण्याची दुर्गंधी.

वैदूवाडीतील नवीन म्हाडा कॉलनी परिसरात मुख्य रस्त्याच्या कडेला साचणारे कचऱ्याचे ढीग.

प्रभागात झालेली प्रमुख कामे

महापालिकेचे स्वर्गीय विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह

मगरपट्टा चौक परिसरातील रस्त्याचे रुंदीकरण

उद्यानांत ओपन जिम, लहान मुलांसाठी खेळणीचे साहित्य

अण्णासाहेब मगर हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांट

मुंढवा येथील नदीवरील जुन्या पुलाचे नूतनीकरण

नागरिक म्हणतात...

प्रभागातील कै. रामचंद्र बनकर क्रीडांगणाची दुरवस्था झाली आहे. हे क्रीडांगण सार्वजनिक कार्यक्रम, उत्सवासाठी भाड्याने दिली जात आहे. मात्र, अधिकारी पावत्या न घेताच क्रीडांगण भाड्याने देत असल्यामुळे या मैदानाची दुरवस्था झाली आहे.
भास्कर सोलापूरकर, सिद्धेश्वर खुपसे, ज्येष्ठ नागरिक
ग. प्र. प्रधान नक्षत्र उद्यानाच्या बाजूला स्मशानभूमी आणि ओढा असल्याने दुर्गंधीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. या समस्या सोडविण्याकडे माजी लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. तसेच, या ठिकाणी पार्किंगचा अभाव असून, पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही.
श्रीमंत भावीकट्टी, संतोष मते, रहिवासी
अमर कॉटेज परिसरातील महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला क्लब, स्वीमिंग पूल, क्रीडांगण सध्या बंद अवस्थेत आहे. प्रशासनाला क्लब चालूच करायचा नव्हता, तर मग कोट्यवधी रुपयांचा खर्च कशासाठी केला.
किशोर पोळ, दीपक अमृतकर, रहिवासी
मुंढवा येथील गांधी चौकामध्ये सुसज्ज व्यायामशाळा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राची उभारणी केली. भाजी मंडईसाठी इमारत बांधली. मुंढव्यातील मनपा दवाखान्यामध्ये डायलिसिस, एक्स-रे आणि सोनोग््रााफीची सुविधा उपलब्ध करून दिली. मुंढवा-खराडीदरम्यान नदीपात्रातील पुलाची उभारणी, मगरपट्टा व माळवाडी परिसरात ड्रेनेजलाइन आणि पावसाळी वाहिन्यांची कामे केली आहेत.
पूजा कोद्रे, माजी नगरसेविका
महापालिकेच्या माध्यमातून प्रभागात स्वर्गीय विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह उभारले आहे. विद्युतवाहिन्यांचे भूमिगतीकरण, नवीन डीपी रस्ते, नवीन डीपी बॉक्स, पददिवे, जलवाहिन्या, ड्रेनेजलाइन आदी विकासकामे केली आहेत. तसेच, मगरपट्टा चौक परिसरात रस्त्याचे रुंदीकरण केले आहे. मगरपट्टा, माळवाडी आणि 15 नंबर भागात ड्रेनेजलाइन, रस्ते आदींची कामे करण्यात आली आहेत.
चेतन तुपे, माजी नगरसेवक तथा विद्यमान आमदार
प्रभागात उद्याने विकसित केली असून, त्यामध्ये ओपन जिम आणि लहान मुलांना खेळण्यासाठी साहित्य बसविण्यात आले आहे. रस्त्याचे डांबरीकरण आणि कॉंक्रिटीकरण, पदपथाचे सुशोभीकरण, जलवाहिन्या, ड्रेनेजलाइन, पावसाळी वाहिन्या, विद्युत केबल भूमिगत करणे, विरंगुळा केंद्र, कालव्यालगत सुरक्षा जाळ्या आदी विकासकामे केली आहेत. अण्णासाहेब मगर हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांट सुरू केला.
हेमलता मगर, माजी नगरसेविका
मुंढवा येथील नदीवरील जुन्या पुलाचे नूतनीकरण केले. नवीन जलवाहिनी टाकून मुंढवा व केशवनगर येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविला. नोबल हॉस्पिटल ते ज्ञानदीप सोसायटीदरम्यानच्या रस्त्याचे काम केले. 15 नंबर येथे क्रीडांगण, समाजमंदिर व ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र बांधले. आकाशवाणी येथे लहान मुलांसाठी क्रीडांगण आणि उद्यानाची सुविधा उपलब्ध केली आहे.
बंडूतात्या गायकवाड, माजी नगरसेवक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT