

पुणे/धायरी : कोंढव्यातील एका सराइत गुन्हेगाराचा लोखंडी शस्त्राने वार करून, डोके झाडाच्या कुंडीने ठेचून वडगाव परिसरात चार ते पाच जणांनी निर्घृण खून केला. तौकीर रफिक शेख (वय 23, रा. मक्का मज्जिद , कोंढवा) असे खून झालेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. शवविच्छेदनासाठी तौकीर याचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठवून देण्यात आला होता. ही घटना सोमवारी (दि.17) दुपारी दोन वाजेच्या सुमारास वडगाव परिसरातील कृष्णकुंज इमारतीच्या पार्किंगमध्ये घडली आहे.
याबाबत बोलताना सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप दाइंगडे यांनी सांगितले, खून झालेला तरुण तौकीर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो त्याच्या मित्रासोबत वडगाव परिसरात आला होता. त्यावेळी येथील कृष्णकुंज इमारतीच्या पार्किंगमध्ये चार ते पाच जणांच्या टोळक्याने लोखंडी पालघन आणि झाडाच्या कुंडीने त्याच्यावर हल्ला केला. पालघनने वार करून, डोके कुंडीने ठेचल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या तौकीरचा जागीच मृत्यू झाला होता.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सिंहगडरोड पोलिस ठाण्याचे पथक, गुन्हे शाखेची पथके त्याचबरोबर पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. तौकीर याचा खून पूर्वीच्या वादातून झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्याचा खून करणारे आरोपी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी पथके रवाना झाली असून, त्यांना पकडल्यानंतरच तौकीरचा खून नेमक्या कोणत्या कारणातून करण्यात आला हे समजेल, अशी माहिती दाइंगडे यांनी दिली.