टाकळी भीमा: रामानंद संप्रदाय धार्मिक आणि सामाजिक बांधिलकी जपली जात असून, ‘तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा’ हा संदेश केवळ उपदेशापुरता न राहता प्रत्यक्ष कृतीत उतरवला जात आहे. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने सुरू झालेला ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ हा उपक्रम लोकचळवळीचे स्वरूप घेत आहे. शिरूर तालुक्यात या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, येथील त्यांच्या अनुयायांनी श्रमदानातून आतापर्यंत 31 कच्चे बंधारे यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहेत.
रविवार, सोमवारपर्यंत शिरूर तालुक्यातील विविध गावांमध्ये एकूण जवळपास 31 कच्चे बंधारे बांधून पूर्ण करण्यात आले आहेत. ही सर्व कामे भक्तगणांच्या श्रमदानातून स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून करण्यात आली आहेत. या बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरण्यास मदत होणार असून, यामुळे विहिरी, बोरवेल तसेच शेतीसाठी दीर्घकाळ लाभ होणार आहे.
यामध्ये रांजणगाव गणपती, शिक्रापूर, अण्णापूर, पाबळ, सणसवाडी, निर्वी, कोंढापुरी, टाकळी भीमा, हिवरे, आमदाबाद, कान्हुर मेसाई, कवठे यमाई, कोरेगाव भीमा, काठापूर, जातेगाव, करंदी, पिंपरखेड, कासारी, खंडाळे, निमगाव म्हाळुंगी, कारेगाव अशा 22 गावांमध्ये बंधारे बांधून पूर्ण करण्यात आले आहेत.
या उपक्रमात युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच सेवाभावी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. कुणी श्रमदान केले, कुणी नियोजनात मदत केली, तर कुणी साहित्य उपलब्ध करून दिले. त्यामुळे हा उपक्रम केवळ जलसंधारणापुरता मर्यादित न राहता सामाजिक एकात्मतेचे उत्तम उदाहरण ठरत आहे.
तालुक्यातील सर्व सेवा केंद्रांनी नियोजनबद्ध काम करत उल्लेखनीय योगदान दिले असून, तालुका सेवा समिती, शिरूर यांचा उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे. या उपक्रमाबद्दल तालुकास्तरावरून सर्व सेवा केंद्रांचे कौतुक व आभार व्यक्त करण्यात येत असून, येत्या काळात ही सेवा अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहील, असा विश्वास शिरूर तालुका सेवा समितीने व्यक्त केला आहे.