Rajgurunagar Illegal Hoardings Pudhari
पुणे

Rajgurunagar Illegal Hoardings: राजगुरुनगरमध्ये अनधिकृत होर्डिंग्जवर नगराध्यक्षांच्या वाढदिवसाचे फ्लेक्स; दुहेरी निकषांवर नागरिकांचा संताप

२८ धोकादायक होर्डिंग्ज हटविण्याची नोटीस, तरी कारवाई नाही; १०० हून अधिक फ्लेक्समुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

राजगुरुनगर: राजगुरुनगर शहरात सर्वसामान्य नागरिकांसाठी नियम कठोर असताना, स्वतः नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ आणि त्यांच्या समर्थक नगरसेवकांसाठी मात्र नियम फक्त कागदावरच राहतात, अशी तक्रार नागरिक करत आहेत. शहरात २८ अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंग्ज उभ्या असताना, त्याच होर्डिंग्जवर नगराध्यक्षांच्या वाढदिवसाचे प्रचंड फ्लेक्स लावून साजरा करण्यात आला. ही घटना राजगुरुनगर नगरपरिषदेच्या 'अजब नियम' आणि 'फक्त आमच्यासाठी' या वृत्तीचे उत्तम उदाहरण ठरत आहे.

नगरपरिषद प्रशासनाने वारंवार अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याची नोटीस बजावल्याचे सांगितले, तरी प्रत्यक्षात एकही होर्डिंग हटवले गेले नाही. उलट, या धोकादायक होर्डिंग्जवर नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ यांचे मोठे फोटो आणि 'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा' असे फ्लेक्स लावण्यात आले. एकूण १०० हून अधिक फ्लेक्स आणि बॅनर्सने शहराचा नकाशा विद्रूप केला गेला. मुख्य रस्ते, चौक आणि निवासी भागातही अनधिकृत फ्लेक्सबाजी रंगली.

शहरातील नागरिकांच्या मते, किरकोळ दुकानदार किंवा सामान्य व्यक्तीने फ्लेक्स लावला तर तत्काळ कारवाई होते. अभिनंदनाचे फ्लेक्स कचरा गाडीत उघड्यावर टाकून नेले जातात. परंतु नगराध्यक्ष आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी केलेल्या फ्लेक्सबाजीवर प्रशासन मौन बाळगते. 'शहरात पावसाळ्यात होर्डिंग्ज कोसळण्याची भीती व्यक्त केली जात असताना, नगराध्यक्ष स्वतःच त्यांचा वापर करत आहेत. हे दुर्दैवी आहे,' असे एक स्थानिक रहिवासी म्हणाले.

नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, 'नोटीस पाठवली आहे' एवढेच उत्तर मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांच्या कडून मिळाले. मात्र नोटीसीनंतरही होर्डिंग्ज कायम आहेत आणि त्यावर वाढदिवसाचे फ्लेक्सही कायम आहेत. यावरून प्रशासन आणि राजकीय नेत्यांमध्ये 'समझोता' असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

नागरिक संघटनांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पंचायत समिती समोर, वाडा रस्त्यावर अनेक हातगाड्या लागतात. याचे अनधिकृत भाडे नगरपरिषद ठेकेदारामार्फत आकारते. या टपऱ्यांमुळे मोठा रस्ता असुनही येथे नियमित वाहतूककोंडी होत असते. शिवाय पंचायत समिती आवाराचे विद्रुपीकरण होते. शाळा, शासकीय कार्यालय, बाजारपेठ अशा गजबजलेल्या ठिकाणी आणि याच वर्दळीत नगराध्यक्ष गुंडाळ समर्थकांनी फ्लेक्स लावले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT