Nationalist Congress Party Returns to Power After 14 Years Pudhari
पुणे

Rajgad Panchayat Samiti Result 2026 : राजगड तालुक्यात सत्तापरिवर्तन

राष्ट्रवादी काँग्रेस १४ वर्षांनंतर पुन्हा सत्तेत

पुढारी वृत्तसेवा

वेल्हे : राजगड तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये राजगड तालुक्यात राष्ट्रवादीने आमदार शंकर मांडेकर यांच्या नेतृत्वाखाली सत्तापरिवर्तन करून राजगड तालुका पंचायत समितीवर झेंडा फडकाविला. माजी आमदार संग्राम थोपटे यांचे वर्चस्व असलेल्या राजगड तालुक्यात राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे.

राजगड तालुक्यातील विंझर पानशेत जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमोल नलावडे यांनी १६०२ मतांनी विजय मिळविला. नलावडे यांना ८६७८, तर पराभूत भाजपचे उमेदवार शिवराज शेंडकर यांना ७०७६ मते मिळाली. नलावडे हे सलग दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत. तर, त्यांच्या पत्नी वसुधा नलावडे याही जिल्हा परिषद सदस्या होत्या. १४ वर्षांपासून विंझर पानशेत गटामध्ये नलावडे यांची सत्ता आहे.

विंझर गणातून भाजपचे गणेश जागडे विजयी झाले. जागडे यांना ५०३२, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे पराभूत उमेदवार अंकुश दसवडकर यांना ३६२८ मते मिळाली. पानशेत गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुवर्णा राऊत विजयी झाल्या. सुवर्णा राऊत यांनी माजी सभापती सीमा राऊत यांचा पराभव केला. सुवर्णा राऊत यांना ४५२३ मते, तर भाजपच्या सीमा राऊत यांना ३३८३ मते मिळाली.

वांगणी-वेल्हे बुद्रुक गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे तानाजी मांगडे विजयी झाले. त्यांनी भाजपचे उमेदवार शिवाजी चोरघे यांचा ५५० मतांनी पराभव केला. मांगडे यांना १०२६२, तर चोरघे यांना ९७१२ मते मिळाली.

वांगणी गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप खुटवड विजयी झाले. त्यांनी भाजपचे विशाल वालगुडे यांचा ४६३ मतांनी पराभव केला. खुटवड यांना ४०३९, तर वालगुडे यांना ३५७६ मते मिळाली. वेल्हे बुद्रुक गटात राष्ट्रवादीच्या सीता खुळे यांनी भाजपच्या निकिता पवार यांचा २३७२ मतांनी पराभव केला. खुळे यांना ५८५८, तर पवार यांना ३४७६ मते मिळाली. आपापले उमेदवार विजयी होताच कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष केला.

राजगड तालुक्यातील जनतेने आमचे नेते दिवंगत अजित पवारांच्या विचारांना व आमदार शंकर मांडेकर यांच्या विकासकामांच्या जोरावर आम्हाला निवडून दिले आहे, अशी प्रतिक्रिया राजगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष किरण राऊत यांनी व्‍यक्‍त केली. हा विजय सर्वसामान्य जनतेचा आहे. मागील काळात केलेल्या विकासकामांना तालुक्यातील कष्टकरी लोकांनी मतरूपी आशीर्वादाने साथ दिली, अशी प्रतिक्रिया जिल्‍हा परिषदेचे सदस्‍य अमोल नलावडे यांनी व्‍यक्‍त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT