वेल्हे: राजगड तालुक्यातील पानशेत तसेच पश्चिम हवेली सिंहगड भागात वन्यप्राण्यांच्या शिकाऱ्यांनी धुमाकूळ घातला आहे. पानशेत रस्त्यावरील ओसाडे (ता. राजगड) येथे दुर्मीळ चौसिंगा हरणाला बंदुकीने गोळ्या घालून ठार केल्याबद्दल चार जणांना राजगड तालुका वन विभागाने हरणाच्या मांसाची वाटणी करताना रक्ताळलेल्या हातासह जेरबंद केले आहे.
या घटनेमुळे पानशेत सिंहगड भागात खळबळ उडाली आहे. नवीन वर्षाच्या तोंडावर पर्यटकांची वर्दळ असलेल्या या परिसरात शिकारीचा प्रकार घडल्याने वन विभाग सावध झाला आहे. राजगड वन विभागाचे वनरक्षक राजेंद्र निबोंरे हे जंगलात गस्तीवर असताना रविवारी (दि.28) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास शिकारीचा हा प्रकार उघडकीस आला.
समीर वसंत पिलाणे (वय 36) , गणेश बबनराव लोहकरे (38 दोघे राहणार, रा. ओसाडे), नवनाथ चंद्रकांत पवळे ( वय 40, रा. सोनापूर, ता. हवेली) व पांडुरंग दत्तात्रय कदम (वय 47, रा. निगडे मोसे, ता. राजगड) अशी अटक करण्यात आलेल्या शिकाऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी राजगड तालुका वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे अधिक तपास करत आहेत. वन्यजीव अधिनियम कायद्यानुसार चौघा शिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर पिलाणे, नवनाथ पावले, गणेश लोहकरे व पांडुरंग कदम यांनी सरकारी वनक्षेत्राशेजारच्या खासगी मालकीच्या जंगलात चौसिंगा हरणाला बंदुकीने गोळ्या घालून ठार मारले. वनरक्षक राजेंद्र निबोंरे यांच्या जागरूकतेमुळे आरोपी शिकार केलेल्या हरणाच्या मांसासह सापडले. त्यांच्याकडून बंदुकीसह इतर हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
शिकारीची माहिती मिळताच पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते व सहाय्यक वनसंरक्षक शीतल राठोड यांच्या देखरेखीखाली राजगडचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे, वन परिमंडळ अधिकारी स्मिता अर्जुन, दया डोमे, वैशाली हाडवळे, मंजूषा घुगे, वनरक्षक राजेंद्र निंभोरे, वनरक्षक ए. आर. सोनकांबळे, वनरक्षक एस. एन. कांबळे, वनरक्षक वाय. बी. टिकोळे, वनरक्षक सुनील होलगिर, वनरक्षक निखिल रासकर, वनरक्षक एस. के. भैलुमे, वनरक्षक बी. एल. जगताप, वनरक्षक स्वप्नील उंबरकर, वनरक्षक अर्चना कोरके, वनरक्षक अमोल गायकवाड, वनरक्षक संतोष रणसिंग, वनरक्षक विकास निकम यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी सखोल तपास सुरू होता. यापूर्वी या व इतर शिकारींनी कोणत्या कोणत्या जंगलात, खासगी रानात वन्यजीवांची शिकार केली आहे का, इतर शिकारी आहेत का, बंदुकीला परवाना आहे का आदी बाबींचा सखोल तपास वन विभागाची पथके करत आहेत.
वन्यप्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी वन्यजीव अधिनियम 1972 च्या कलमाखाली वन्यप्राण्यांची निर्घृण शिकार करणाऱ्यास 7 वर्षे कारावास व 25 हजार रुपये दंड अशा शिक्षेची तरतूद आहे. हा गुन्हा अजामीनपात्र असून, दखलपात्र आहे. वन्यप्राण्यांच्या शिकारीला आळा घालण्यासाठी शिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी वन विभागाची पथके, गुप्तहेर सज्ज केले आहेत.अनिल लांडगे राजगडचे वनपरिक्षेत्र अधिकारी