वेल्हे : राजगड तालुक्यात राज्यातील तुलनेत सर्वाधिक कुणबी नोंदी आढळल्या असून कुणबी जातीचे दाखले मिळविण्यासाठी तहसील कार्यालयात रोजच गर्दी होत आहे. तहसील कार्यालयातील विशेष कुणबी नोंद कक्षात तपासलेल्या 50 हजारांहून अधिक दस्तऐवजांतून 6 हजार 590 कुणबी नोंदी आढळल्या आहेत. तर नोंदींवरून 2 हजार 980 जणांना दाखले देण्यात आले आहेत.(Latest Pune News)
मराठा आरक्षण आंदोलनाआधी राजकीय आरक्षण, सरकारी नोकरी व इतर लाभासाठी मोजक्या मराठा समाजाने कुणबी जातीचे दाखले घेतले होते, मात्र आता गावोगाव, वाड्या, वस्तीतील सामान्य मराठा बांधवांनी आपल्या पूर्वजांच्या कागदपत्रांवरून दाखले काढणे सुरू केले आहे.
राजगड तालुका तहसील कार्यालयाने गावोगावच्या कुणबी नोंदीची माहिती जाहीर करून गाववार याद्या तयार केल्या. त्यामुळे नागरिकांना पूर्वजांच्या जन्म-मृत्यू नोंदी व जमीन महसूल पुराव्यांच्या आधारे सहजपणे कुणबी जातीचे दाखले काढता येत आहेत आणि दलालांची अरेरावी कमी झाली आहे. यामुळे एका जात दाखल्याचा लाखो रुपयांचा बाजार काही हजार रुपयांवर आला आहे.
सरकारी दस्तऐवजांमध्ये कुणबी नोंदी मोडी लिपीत आहेत. प्रमाणपत्र देण्यासाठी वाचनाची सोय नसल्याने काही मोडीवाचक 2 हजार रुपयांपासून शुल्क आकारत आहेत. शासनाने त्यासाठी कोणतीही नियमावली बनविलेली नाही.
तहसीलदार निवास ढाणे यांनी सांगितले की, आत्तापर्यंत विविध सरकारी दफ्तरांतून मिळालेल्या नोंदींवरून 2 हजार 980 जणांना कुणबी जातीचे दाखले देण्यात आले आहेत. नागरिकांनी सर्व कागदपत्रे पुरवून अर्ज सादर केल्यावर पडताळणी करून दाखले दिले जात आहेत.
वेल्हे बुद्रुक येथील नागरी सुविधा केंद्रात विद्यार्थी, युवक, महिला सहित नागरिक दररोज 30 ते 40 अर्ज दाखल करत आहेत. मराठा आरक्षण आंदोलनामुळे कुणबी जातीचे दाखले काढण्यासाठी सामान्य नागरिकही जागरूक झाले आहेत.
ऐतिहासिक संदर्भानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून राजगड, सिंहगड भागातील मराठा बांधवांचा उल्लेख कुणबी म्हणून केला आहे. दि. 25 ऑक्टोबर 1675 रोजी खामगाव मावळची पाटीलकीची सनद बकाजी फर्जंद यांना देताना ’पाटील व कुणबी लोक गोतात वर्तत आहेत’ असा उल्लेख आहे. बिटिश राजवटीतही मराठा समाजाचा उल्लेख कुणबी असा आढळतो.