

नारायणगाव : बंद फ्लॅटचा दरवाजा तोडून चोरट्यांनी कपाटातील 47 ग्रॅम सोन्याचे दागिने, 20 हजारांची रोख रक्कम असा सुमारे 5 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. वारुळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील महाविद्यालय रस्त्यालगत असलेल्या साईधाम सोसायटीमध्ये रविवारी (दि. 12) पहाटे साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला. तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.(Latest Pune News)
सीसीटीव्ही फुटेजवरून दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी नवनाथ नलावडे यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मात्र, पोलिस ठाण्याच्या सर्व्हरला प्रॉब्लेम असल्याने फिर्याद दाखल झाली नाही. पोलिसांनी फिर्याद दाखल करण्यासाठी नंतर येण्यास सांगितल्याचे नलावडे यांनी माहिती दिली.
नवनाथ नलावडे हे साईनाथ सोसायटीमध्ये राहतात. ते फ्लॅटला कुलूप लावून शनिवारी (दि. 11) गावी धोलवड येथे गेले होते. त्यानंतर सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास दोन चोरट्यांनी बंद फ्लॅटचा दरवाजा तोडला. त्यांनी कपाटातील मंगळसूत्र, चैन, कानातील वेल, टॉप आदी 47 ग्रँम वजनाचे सोन्याचे दागिने व 20 हजार रुपये चोरून नेले.
याच सोसायटीतील आणखी दोन बंद फ्लॅटचे कडीकोयंडे तोडून चोरीचा प्रयत्न झाला आहे. मात्र, या फ्लॅटमध्ये कोणी राहण्यास नसल्याने चोरट्यांचा प्लॅन फसला. दरम्यान, आनंदवाडी येथील उज्ज्वला पाटोळे या पादचारी महिलेच्या गळ्यातील 14 ग्रँम वजनाचे मंगळसूत्र शनिवारी (दि. 11) सकाळी साडेदहा वाजता दुचाकीवरील आलेल्या चोरट्यांनी लांबविले. पाटोळे यांनी नारायणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
काही महिन्यांपूर्वी वारुळवाडीच्या हद्दीमध्ये पोलिस कर्मचाऱ्याच्या घरीच दिवसा चोरी झाली होती. या चोरीचा देखील अद्याप तपास लागला नाही. सध्या नारायणगाव परिसरामध्ये भुरट्या चोऱ्या वाढू लागल्या आहेत. गृहसोसायटीतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण संपागे यांनी केले आहे.