खडकवासला: राजगड तालुक्यातील वनक्षेत्रातील पन्नासहून अधिक पाणवठे वारंवार मागणी करूनही निधी मिळत नसल्याने कोरडे ठणठणीत पडले आहेत. दुसरीकडे उन्हाची तीवता वाढल्याने जंगल वनक्षेत्रातील वन्यजीवांचे पाण्याअभावी हाल सुरू आहेत.
घनदाट जंगल आणि विविध जातींच्या दुर्मीळ पक्षी, वन्यप्राण्यांचा अधिवास असलेल्या राजगड तालुक्यातील राजगड तोरणा, पानशेत घिसर, पासली, वरोती, सिंगापूर आदी वनक्षेत्रातील हजारों वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. डोंगर, जंगलातील चारा, गवत खाद्य भीषण वणव्यात जळून खाक झाले आहेत. त्यामुळे खाद्य, पाण्यासाठी वन्यजीव मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत आहेत. हरीण, ससे, कोल्हे, माकड, मोर, चितळ, सांबर आदी वन्यजीव खाद्य पाण्यासाठी गुंजवणी, पानशेत, वरसगाव धरणाच्या पाणलोटावर येत आहेत.
वनक्षेत्रालगतच्या डोंगर टेकड्या नष्ट करून मोठ्या प्रमाणात बांधकामे, रस्ते, प्लॉटिंगचे सामाज्य पसरले आहे. त्यामुळे वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. असे असताना वन्यजीवांसाठी वन विभागाने वनक्षेत्रात, जंगलात बांधलेल्या कृत्रिम पाणवठे, वनतळ्यात पाणी सोडण्यासाठी राजगड तालुका वन विभागाकडे निधीच उपलब्ध नाही. मार्च महिना आता अर्धा संपला तरी अद्यापही एकाही तळ्यात थेंबभरही पाणी टाकले नाही.
भोर्डी, केळद आदी ठिकाणी वन विभागाने लाखो रुपये खर्च करून उभारलेली वनतळी कोरडी ठणठणीत आहेत. हजारो पक्षी, वन्यप्राण्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू आहे. कावळे, चिमणी, सुतारपक्षी, मोर, लांडोर, माकड, ससे आदी वन्यजीवांची संख्या कमी झाली आहे. निधी उपलब्ध वनांमधील पाणवठ्यांमध्ये पाणी सोडण्याची मागणी पशुप्रेमी आणि ग््राामस्थांकडून होत आहे.
यंदा दिवाळीपासूनच उन्हाची तीवता अधिक आहे. त्यामुळे जंगलातील नैसर्गिक पाणवठे डिसेंबरमध्येच कोरडे पडले. वरघड, मोसे, आंबेगाव, पासली भागातील जंगलात थेंबभर पाणी नाही.विनोद दिघे, ग््राामस्थ, वेल्हे खुर्द
शासनाकडे पाठपुरावा करूनही वन तळ्यात तसेच पाणवठ्यात पाणीपुरवठा करण्यासाठी तसेच देखभाल दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला नाही. त्यामुळे पाणवठे कोरडे पडले आहेत. पाण्यासाठी स्थलांतर करणाऱ्या वन्यजीवांची शिकार होणार नाही. वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी वन कर्मचारी, वनरक्षकांना सूचना दिल्या आहेत.अनिल लांडगे, वन परिमंडळ अधिकारी, राजगड तालुका