Sugarcane Pudhari
पुणे

Rahu Daund Sugarcane Rate: राहू बेट परिसरात उसाला विक्रमी दर; गुऱ्हाळ घरांवर ३९०० रुपये प्रतिटन

कारखाने बंद झाल्यानंतर गुळाच्या मागणीमुळे दरात उसळी; शेतकरी समाधानी

पुढारी वृत्तसेवा

राहू: दौंड तालुक्यातील साखर कारखान्यांचे धुराडे शांत झाले असतानाच, राहू बेट परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. परिसरातील गुर्‌‍हाळ घरांवर उसाला प्रतिटनाला 3 हजार 500 ते 3 हजार 900 रुपयांपर्यंत विक्रमी बाजारभाव मिळत आहे. कारखान्यांच्या तुलनेत गुर्‌‍हाळ घरांवर मिळणारा हा दर यंदाचे सर्व विक्रम मोडीत काढणारा ठरत आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी समाधानी दिसत आहे.

तालुक्यातील महत्त्वाचे मानले जाणारे श्रीनाथ म्हस्कोबा, दौंड शुगर, भीमा-पाटस आणि ओंकारेश्वर शुगर या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आता अधिकृतपणे संपला आहे. तालुक्यातील वरील चार, तसेच व्यंकटेश ॲग््राो या कारखान्यांकडून ऊसतोडणी करण्यात येत असते. यंदा गाळप हंगाम उसाअभावी लवकरच संपला.

कारखाना हंगाम अखेरीस असताना अनेक शेतकऱ्यांनी भविष्यात दर वाढतील, या आशेने आपला ऊस राखून ठेवला होता. शेतकऱ्यांचा हा अंदाज आता खरा ठरताना दिसत असून, गुर्‌‍हाळ मालकांकडून उसाला मोठी मागणी येत आहे. यंदा उसाच्या टंचाईमुळे आणि गुळाला असलेल्या मागणीमुळे गुर्‌‍हाळ चालकांनी दराची स्पर्धा लावली आहे. सध्याची परिस्थिती पाहता प्रतिटन 3 हजार 500 ते 3 हजार 900 रुपये थेट रोख स्वरूपात मिळत आहेत. कारखान्याकडे ऊस देण्यासाठी करावी लागणारी प्रतीक्षा आणि तोडणीची अडचण गुर्‌‍हाळ घरांकडे वळल्यामुळे कमी झाली आहे. घरच्या घरी किंवा जवळच्या परिसरात गाळप होत असल्याने वाहतुकीचा खर्चही वाचत आहे.

सध्या उन्हाळ्याची चाहूल लागल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. बाजारात चाऱ्याचे दर गगनाला भिडले आहेत. अशा स्थितीत उसाचे पाचट आणि वाढे (चारा) जनावरांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पशुधन आहे, त्यांच्यासाठी तर ही दुहेरी मेजवानी ठरत आहे. एकीकडे उसाला चांगला दर आणि दुसरीकडे जनावरांसाठी चारा उपलब्ध होत आहे. यंदा उसाचे क्षेत्र कमी असल्याने सुरुवातीपासूनच चांगल्या दराची अपेक्षा होती.

कारखाने बंद झाल्यावर गुर्‌‍हाळ घरांनी दिलेला 3 हजार 900 रुपयांचा दर आजवरचा सर्वाधिक असून, यामुळे शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे शिल्लक राहत आहेत.
विलास कुदळे, ऊस उत्पादक शेतकरी
एकीकडे गुऱ्हाळ घरांवर उसासाठी चांगल्या पद्धतीने दर मिळत असताना अनेक गुऱ्हाळ घरमालकांची परप्रांतीय गुर्‌‍हाळ चालकांनी फसवणूक केली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची देखील फसवणूक होत आहे. याकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
चंद्रकांत सोनवणे, ऊस उत्पादक शेतकरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT