पुणे: राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत रब्बी हंगाम 2025-26 मध्ये सहा पिकांचा समावेश असून शेतकऱ्यांचा सहभाग हा कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. रब्बी हंगामात योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत ही पीकनिहाय निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत) करिता दिनांक 30 नोव्हेंबर, गहू (बागायत), हरभरा, रब्बी कांदा या पिकांकरिता दिनांक 15 डिसेंबरपर्यंत सहभागी होता येईल. तर उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग या पिकांकरिता दिनांक 31 मार्च 2026 अशी मुदत असल्याची माहिती कृषी आयुक्तालयातील मुख्य सांख्यिक वैभव तांबे यांनी दिली. (Latest Pune News)
पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी राज्य सरकारने राज्यात खरीप 2025 व रब्बी हंगाम 2025-26 करिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. पीक विमा योजनेसाठी पीएमएफबीवाय पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. रब्बी हंगाम 2025-26 गहू (बागायत), रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग व रब्बी कांदा (6 पिके) या अधिसूचित पिकांसाठी, अधिसूचित महसूल मंडळ/ क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल.
कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेमार्फत योजनेत सहभागी होण्यासाठी निश्चित केलेल्या नमुन्यात अर्ज भरून देणे आवश्यक आहे. जर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसेल तर तसे त्यांनी नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेस लेखी कळविणे आवश्यक आहे. जे शेतकरी स्वत:च्या स्वाक्षरीसह योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र देणार नाहीत, त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल.
रब्बी हंगामासाठी दोन विमा कंपन्यांची नियुक्त केलेली आहे. त्यामध्ये पुण्यातील आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स या कंपनीकडे धाराशिव, लातूर, बीड हे तीन जिल्हे आहेत. तर मुंबई येथील भारतीय कृषी विमा कंपनीकडे उर्वरित 31 जिल्हे आहेत. त्यामध्ये अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा, परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, भंडारा, पालघर, रायगड, वाशिम, बुलडाणा, सांगली, नंदुरबार, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश आहे. तरी रब्बी हंगाम 2025-26 मध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहनही तांबे यांनी केले आहे.
...तर विमा कंपनी, शासकीय कार्यालयांशी साधा संपर्क
पीक विम्याबाबतच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तत्काळ आपल्या संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याही कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच रब्बी हंगाम 2025-26 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या पोर्टलवर http://pmfby.gov.in/ स्वत: शेतकरी यांनी अथवा बँक, विमा कंपनीने नियुक्त केलेले एजंट, क्रॉप इंन्शुरन्स ॲप व सामूहिक सेवा केंद्रांमार्फत (सीएससी) योजनेतील सहभागाची नोंदणी करावी.