सासवड : पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. उमेदवारी न मिळाल्याने अनेक इच्छुकांनी बंडाचा झेंडा उंचावल्याचे स्पष्ट झाले असून, ही बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान सर्वच पक्षांच्या नेत्यांपुढे उभे ठाकले आहे. विशेषतः भाजपमध्ये बंडखोरी शमविण्यात पक्षनेत्यांना यश येणार की नाही, याची उत्सुकता असून, त्याचे उत्तर 27 जानेवारीला मिळणार आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी तालुक्यात नाट्यमय घडामोडींना वेग आला. शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या वीर गटात मोठा राजकीय धक्का बसला. शिवसेनेचे तालुकाध्यक्ष व इच्छुक उमेदवार हरिभाऊ लोळे यांची उमेदवारी नाकारल्याने त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करीत सर्वांनाच आश्चर्यचकित केले. भाजपनेही तत्काळ लोळेंना उमेदवारी जाहीर करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली.
याचवेळी बेलसर गटात राष्ट्रवादी काँग््रेासला मोठा धक्का बसला. राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार व माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे यांची उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी काँग््रेासमध्ये प्रवेश केला. या घडामोडीचा फायदा काँग््रेासला कितपत होतो आणि राष्ट्रवादीला किती फटका बसतो, याचे स्पष्ट चित्र 7 फेबुवारीला मतमोजणीअंती समोर येणार आहे.
राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या गराडे गटात तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपकडून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गंगाराम जगदाळे यांच्या कन्या दिव्या गंगाराम जगदाळे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग््रेासकडून आमदार बापूसाहेब पठारे यांच्या कन्या रूपाली अमोल झेंडे, तर शिवसेनेकडून माजी जिल्हा परिषद सदस्या ज्योती राजाराम झेंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, येथे चुरशीची लढत होणार असल्याचे संकेत आहेत.
पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग््रेास आणि काँग््रेास या सर्व प्रमुख पक्षांचे उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मात्र, तालुक्यात बंडखोरीचे पीक चांगलेच फोफावले असून, नेतेमंडळी या बंडखोरीचे ‘तण’ काढण्यात यशस्वी ठरणार की बंडखोर अधिक बळावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुतीतील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये उमेदवारी वाटपावरून नाराजीचे नाट्य उफाळून आले आहे. उमेदवारांची यादी अधिकृतरीत्या जाहीर न करता एबी फॉर्म वाटून बंडखोरांना गाफील ठेवण्याचा प्रयत्न अखेर फसला. उमेदवारांची पहिलीच गोपनीय यादी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीला बंडाळीचा जोरदार फटका बसला आहे.
पक्षवाढीसाठी मेहनत घेणाऱ्यांना बाजूला सारून अलीकडेच पक्षात आलेल्यांना तिकीट दिल्याने संघटनांत अस्वस्थता वाढल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. आगामी दिवसांत ही नाराजी शमते की त्याचा परिणाम पुरंदरमधील पुढील राजकीय समीकरणांवर होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
भाजपचे तालुकाध्यक्ष (दक्षिण) संदीप कटके यांच्या पत्नी सुषमा कटके, भाजप जिल्हा उपाध्यक्ष (किसान मोर्चा) महादेव शेंडकर आणि तालुका उपाध्यक्ष हनुमंत काळाणे यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, तिघांच्याही उमेदवारीला नकार दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव असंतोष पसरला आहे. हे तिन्ही नेते भाजपचे जुने, सक्रिय व संघटनात्मक शिस्तीत घडलेले कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. पक्षांतर्गत नाराजी कमी करण्यासाठी नाराज नेत्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असले तरी, ’जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्यांना संधी’ दिल्याची भावना भाजप कार्यकर्त्यांमध्ये ठळकपणे दिसून येत आहे.