सासवड : पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस यांच्यात अत्यंत चुरशीची लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बंडखोरी, नाराजी आणि पक्षांतरामुळे संपूर्ण तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गराडे गटात तिरंगी लढत होत आहे. भाजपकडून माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे यांच्या कन्या दिव्या जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार बापू पठारे यांच्या कन्या रूपाली अमोल झेंडे, तर शिवसेनेकडून माजी जिल्हा परिषद सदस्या ज्योती राजाराम झेंडे यांच्यात अटीतटीची लढत होत आहे.
गराडे गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना ज्ञानेश्वर कटके, भाजपच्या ललिता दिलीप कटके आणि शिवसेनेच्या सुप्रिया विशाल रावडे यांच्यात तिरंगी सामना आहे. दिवे गणात भाजपचे देवीदास संभाजी कामठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित भाऊसाहेब झेंडे आणि शिवसेनेचे बाळासाहेब दगडू मगर यांच्यात लढत होत आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या वीर गटात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. शिवसेनेचे तालुकाध्यक्ष व इच्छुक उमेदवार हरिभाऊ लोळे यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
या घडामोडीमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला असून, भाजपला याचा किती लाभ होतो हे निकालातून स्पष्ट होणार आहे, तर सहा उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुष्कराज संजय जाधव, शिवसेनेचे समीर अरविंद जाधव, काँग्रेसचे नवनाथ चंद्रकांत माळवे, भाजपचे हरिभाऊ कुंडलिक लोळे, तर अनिल लक्ष्मण धिवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंतकुमार माहूरकर यांनी अर्ज माघारी न घेतल्याने वीर गटात पंचरंगी लढत होत आहे.
भिवडी गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुजा अमोल पोमण, शिवसेनेच्या पूजा सागर मोकाशी, तर भाजपच्या सायली मनोज शिंदे यांच्यात लढत होत आहे. वीर गणात शिवसेनेचे प्रवीण बाळासाहेब जगताप, राष्ट्रवादीकडून उत्तम महादेव धुमाळ, काँग्रेसचे महेश चंद्रकांत धुमाळ, भाजपचे सुधीर शिवाजीराव धुमाळ आणि अपक्ष किशोर विश्वास वचकल रिंगणात आहेत.
बेलसर गटात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय (दत्ताशेठ) झुरंगे यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत निवडणूक रिंगणात उडी घेतली. तसेच राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार अमोल कामठे यांनाही उमेदवारी नाकारण्यात आल्याने ते शिवसेना (उबाठा) कडून निवडणूक लढवत आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित गावे या गटात येत असल्याने मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने झुकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निरा-कोळविहिरे जिल्हा परिषद गटात चौरंगी लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे, भाजपच्या सीमा संदीप धायगुडे, काँग्रेसच्या सविता राजेंद्र बरकडे आणि शिवसेनेच्या भारती अतुल म्हस्के या मैदानात आहेत.
निरा-शिवतक्रार गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोनिका स्वप्निल कांबळे, शिवसेनेच्या रेखा नितीन केदारी, भाजपच्या वंदना बाळासाहेब भोसले, काँग्रेसच्या गीता शुद्धोधन सोनवणे आणि अपक्ष अर्चना देविदास भोसले यांच्यात लढत आहे. कोळविहिरे गणात काँग्रेसच्या रत्नमाला दिलीप खैरे, राष्ट्रवादीच्या स्मिता संतोष निगडे, भाजपच्या सीमा भाग्यवान म्हस्के आणि शिवसेनेच्या शीतल सतीश साळुंके रिंगणात आहेत.
माळशिरस गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजिंक्य रामदास कड, काँग्रेसचे हनुमंत मुरलीधर काळाणे, अपक्ष संदीप श्रीरंग चौंडकर, भाजपचे ज्ञानोबा आप्पा यादव, शिवसेनेचे शरद बाळासाहेब यादव यांच्यात बहुरंगी लढत आहे. बेलसर गणात काँग्रेसचे कुशाल संजय कोलते, भाजपचे कैलास पंढरीनाथ जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नीलेश कृष्णा जगताप, शिवसेनेचे माणिक बाळासोा निंबाळकर आणि अपक्ष सुहास नवनाथ खेडेकर रिंगणात आहेत.