Drug Pudhari
पुणे

Purandar Youth Addiction: पुरंदर तालुक्यात तरुणाई व्यसनांच्या विळख्यात; वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तींची चिंता

दारू, गांजा आणि नशेच्या गोळ्यांचे आकर्षण वाढल्याची चिंता; व्यसनमुक्तीसाठी प्रबोधन, समुपदेशन आणि पोलिसांच्या कठोर कारवाईची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सासवड: पुरंदर तालुक्यातील अल्पवयीन मुलांसह तरुणाईत दारू, गांजा, चरस तसेच नशेच्या गोळ्या घेण्याचे प्रमाण वाढले आहे. हे व्यसन आणि त्यातून निर्माण होणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्ती यामुळे तालुक्यातील सामाजिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच संबंधित कुटुंबाची उघडपणे वाताहत होत आहे.

चित्रपटांतून गुंडगिरीचे उदात्तीकरण, यातून काही युवकांमध्ये नशा करण्याची फॅशन सुरू होते. त्यानंतर हे लोन मित्र परिवारात पसरते. सुरुवातीला कुतूहलापोटी किंवा मित्रांच्या आग्रहाखातर केलेले सेवन पुढे सवयीत आणि त्यानंतर व्यसनात रूपांतरित होते. अनेकांकडे आलेले एकदम पैसे, दुसरीकडे बेरोजगारी, मानसिक तणाव, चुकीची संगत, कौटुंबिक दुर्लक्ष आणि भावनिक एकटेपणातून तरुण व्यसनाच्या आहारी जातात. व्यसनासाठी पैशांची गरज भागवण्यासाठी पुढे चोरी, मारामारी, धमकावणे अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना खतपाणी मिळत आहे.

या गंभीर सामाजिक प्रश्नाकडे पालक, पोलिसांसह लोकप्रतिनिधींनी संवेदनशील भावनेने पाहणे गरजेचे आहे. गावोगावी प्रबोधनपर कार्यक्रम, शाळा-महाविद्यालयांत व्यसनविरोधी व्याख्याने, युवकांसाठी क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक उपक्रम आणि करिअर मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करावे, युवकांच्या हाताला काम, मनाला दिशा आणि कर्तृत्वाला व्यासपीठ मिळाले, तर त्यांना चुकीच्या मार्गाकडे वळण्यापासून रोखता येऊ शकते, असे मत डॉ. उदयकुमार जगताप यांनी व्यक्त केले. दरम्यान, सासवड शहर व ग्रामीण भागातील गुन्हेगारी प्रवृत्तींवर पोलिसांची करडी नजर असून, फरार व पाहिजे आरोपींचा शोध, वॉरंट बजावणी आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्याची मोहीम सुरू राहणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी स्पष्ट केले आहे.

रील्समधील गुंडगिरीचे आकर्षण

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हा तरुणांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. मात्र, याच माध्यमातून प्रसारित होणाऱ्या काही रील्स, व्हिडीओ आणि चित्रपटांतील आशयाचा तरुणांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो. विशेषतः अल्पवयीन आणि किशोरवयीन मुले या आभासी दुनियेतील प्रतिमांनी प्रभावित होतात. यातून ग्रामीण भागात व्यसन आणि गुन्हेगारी फोफावत असल्याचे जाणकार मंडळी सांगत आहेत.

पोलिसांची जाबाबदारी मोठी

पोलिसांकडून अमली पदार्थांविरोधात कारवाया करत आहेत. मात्र अमली पदार्थांची विक्री, साठवणूक आणि पुरवठा करणाऱ्या साखळीचा शोध घेऊन कठोर कायदेशीर कारवाई गरजेची आहे. शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात विशेष लक्ष ठेवणे, संशयास्पद व्यवहारांवर नियंत्रण ठेवणे आणि व्यसनाधीन झालेल्या युवकांना वेळेत समुपदेशन व उपचार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनाने स्वतंत्र कृती आराखडा तयार करावा. व्यसनमुक्ती केंद्रांची उपलब्धता आणि उपचारानंतर युवकांचे पुनर्वसन यालाही प्राधान्य देण्याची मागणी सुजाण नागरिकांतून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT