Garade Dam Pudhari
पुणे

Garade Dam Water Shortage: पुरंदरमध्ये पाणीटंचाईचे सावट; गराडे धरणातून अनधिकृत पाणीउपशाचा आरोप

धरण परिसरात ५० ते ६० वीजपंपांद्वारे पाणीउपसा सुरू असल्याचा दावा; पाणीचोरी रोखण्यासाठी संयुक्त पथक नेमण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सासवड: पुरंदरमध्ये कमी पाऊस, वाढते तापमानामुळे पाणीटंचाईची भीती आहे. त्यातच गराडे धरणातून पाणीउपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. यातून पाणीटंचाईचे सावट गडद होत आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करण्यासह पाणीचोरी रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

गराडे धरणाची एकूण साठवणक्षमता ६५.३७ दशलक्ष घनफूट (एमसीएफटी) आहे. सध्या धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत असल्याची माहिती पाटबंधारे शाखेचे अभियंता अविनाश जगताप यांनी दिली. उन्हाची तीव्रता वाढत असताना पाण्याची मागणीही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा वापर प्राधान्यक्रमाने करणे आणि पिण्याच्या पाण्याचे नियोजन करणे आवश्यक बनले आहे.

या धरणातून सासवड शहरासह कोडीत खुर्द, कोडीत बुद्रुक, चांबळी, हिवरे, बोपगाव, भिवरी आणि गराडे या गावांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवली जाते. तसेच परिसरातील सुमारे ३७२ हेक्टर शेती या धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे, अशी माहिती पाटबंधारे शाखेचे संदेशक एस. एच. कोरपडे यांनी दिली. त्यामुळे धरणातील साठा कमी झाल्यास त्याचा परिणाम केवळ पिण्याच्या पाण्यावरच नव्हे, तर शेतीवरही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

धरण परिसरात सध्या ५० ते ६० वीजपंपांच्या माध्यमातून सर्रास पाणी उपसा केला जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी केला आहे. या अनियंत्रित उपशामुळे धरणातील पाणीसाठ्यावर ताण वाढत आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना अनधिकृत उपसा सुरू राहिल्यास आगामी काळात परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

धरण आणि मुख्य कालव्यांमधून होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी महसूल, पोलिस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकाची नियुक्ती करावी. धरणाच्या कार्यक्षेत्रात अनधिकृतपणे बसवलेले मोठे पंप शोधून जप्त करावेत, तसेच नियमानुसार संबंधितांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी, अशी मागणी श्रीनाथ म्हस्कोबा महाराज ट्रस्टचे मोहन तळेकर यांनी केली.

धरणातील पाणीसाठा कमी होत असताना पाणीचोरी रोखणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाने वेळीच कारवाई करून अनधिकृत पंप जप्त केले नाही, तर आगामी काळात नागरिकांसह जनावरांसाठीही भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ शकते.
संजय आबा कामठे, चांबळीचे माजी उपसरपंच.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT