Water Shortage Pudhari
पुणे

Purandar Water Shortage: पुरंदरमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद; अंबाजीचीवाडीचा तलाव कोरडा, ग्रामस्थांची टँकरची मागणी

विहिरी-कूपनलिकांची पाणीपातळी घटली; पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर

पुढारी वृत्तसेवा

वाल्हे: पुरंदर तालुक्यातील वाल्हे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील पूर्वेकडील अंबाजीचीवाडी येथील तलाव कोरडा पडल्याने परिसरातील नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अंबाजीचीवाडी, मुकदमवाडी, सुकलवाडी आणि गायकवाडवाडी परिसरातील विहिरी व कूपनलिकांची पाणीपातळी खालावली असून, नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

त्यामुळे शेतकरी आणि पशुपालकांची चिंता वाढली आहे. यंदा पाऊस समाधानकारक न झाल्याने तलावातील पाणीसाठा पूर्णपणे संपुष्टात आला आहे. परिणामी, पिण्याच्या पाण्यासह शेती आणि पशुधनासाठी पाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

टंचाईच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा तसेच जनावरांसाठी चारा छावणी उभारावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. सद्यःस्थितीत पाण्याअभावी शेतातील उभी पिके करपू लागली असून, रब्बी हंगामातील बहुतांश पिके संकटात आली आहेत.

दुसरीकडे, जनावरांसाठी हिरवा चारा मिळवणेही अवघड झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करून जनावरांसाठी चारा छावणी उभारावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने तलावात सुरुवातीपासूनच पाणीसाठा कमी होता.

आता तलावातील पाणी पूर्णपणे आटले असून, विहिरी आणि कूपनलिकांमध्ये दिवसभरात केवळ १० ते १५ मिनिटे पुरेल इतकेच पाणी मिळत आहे. सर्वांत मोठा प्रश्न जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा आहे. गेल्या महिन्यापासून हिरवा चारा मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अंबाजीचीवाडीचे शेतकरी हनुमंत पवार यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT