

बारामती: सांगली जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्यांची निवड झाल्यानंतर आता पुणे जिल्ह्यातही स्वीकृत सदस्यपदासाठी राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून, पक्षाचे ५१ सदस्य आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वाट्याला किमान पाच स्वीकृत सदस्यपदे येतील, अशी अपेक्षा पक्षातील कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
या नियुक्त्यांबाबत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार काय निर्णय घेतात, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये महापालिका व नगरपालिकांच्या धर्तीवर स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.
राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील २ हजार २१० निर्वाचित सदस्यांच्या जोडीला २०१ स्वीकृत सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे, तसेच राज्यातील ३०१ पंचायत समित्यांमधील ४ हजार २४ निर्वाचित सदस्यसंख्येत ८०४ नामनिर्देशित सदस्यांची भर पडणार आहे. या सदस्यांना प्रशासकीय कामकाजात संधी मिळणार आहे. असे असले तरी स्वीकृत सदस्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच पंचायत समिती सभापती आणि उपसभापती या पदांच्या निवडणुकीत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे या नियुक्त्यांना राजकीय महत्त्व असले, तरी स्वीकृत सदस्यांचे अधिकार मर्यादित असणार आहेत.
बारामतीसह जिल्ह्यात इच्छुकांची फिल्डिंग!
या निर्णयामुळे बारामतीसह जिल्ह्यातील इच्छुक उमेदवार सक्रिय झाले आहेत. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असल्याने पक्षातील अनेक तरुण कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इच्छुकांना स्वीकृत सदस्यपदाची संधी मिळण्याची आशा आहे. यापूर्वी जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणुकीत संधी न मिळालेल्या कार्यकर्त्यांनाही अपेक्षा आहे.
तरुण, सुशिक्षित कार्यकर्त्यांना संधी मिळणार का?
स्वीकृत सदस्यांच्या नियुक्त्यांमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि खा. पार्थ पवार कोणाला संधी देतात, याची उत्सुकता आहे. तरुण, सुशिक्षित, पक्षाशी निष्ठावंत तसेच संघटनात्मक कामाचा अनुभव असलेल्या कार्यकर्त्यांना प्राधान्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याशिवाय विरोधी गटातील कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रात काम करणारे आणि अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करूनही पदाच्या संधीपासून वंचित राहिलेल्या कार्यकर्त्यांनाही या माध्यमातून प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे.