

कोरेगाव पार्क: येरवडा परिसरातील लक्ष्मीनगर येथील लहुजी वस्ताद साळवे सांस्कृतिक भवनाच्या दुरुस्तीकामावरून नवा वाद निर्माण झाला आहे. महापालिकेच्या मालकीच्या या सांस्कृतिक भवनाच्या दुरुस्तीसाठी सुमारे २० लाख रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. मात्र, या वास्तूचा ताबा एका माजी नगरसेवकाकडे असल्याचा आरोप होत आहे. इमारतीचा खासगी वापर होत असताना पालिकेच्या निधीतून दुरुस्ती कशासाठी? असा सवाल उपस्थित करून याबाबत चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पुणे स्टेशन-जय जवाननगर प्रभागातील (क्र. १३) या सांस्कृतिक भवनाच्या दुरुस्तीसाठी ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयामार्फत निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते उमेश मोरे यांनी अक्षेप घेतला आहे. या वास्तूची मालकी महापालिकेची असली, तरी प्रत्यक्ष ताबा, वापराचे अधिकार आणि मिळणारे उत्पन्न, याबाबत स्पष्टता नसल्याचे मोरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
दुरुस्तीकामाची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, निधीची तरतूद, अंदाजपत्रक आणि कार्यादेश तपासण्याची मागणीही त्यांनी केली आहे. मोरे म्हणाले की, सुमारे २० वर्षांपूर्वी येरवड्यातील नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने या भवनाची उभारणी केली. मात्र, सध्या येथे लग्नसमारंभ, खासगी व्यायामशाळा आणि क्लासेस सुरू आहेत. इमारतीतील जागा व सुविधा भाड्याने दिल्या जात असून, त्यातून महिन्याला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. या उत्पन्नाचा आर्थिक लाभ महापालिकेला मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
वीजपुरवठा खंडित, तरी रोषणाई कशी?
या सांस्कृतिक भवनाचे वीजबिल थकीत असल्याने काही वर्षांपूर्वी वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. असे असताना येथे नियमित विद्युतरोषणाईसह कार्यक्रम कसे पार पडतात? असा सवाल उपस्थित होत आहे. वीजजोडणी आणि बिल भरण्या बाबतही चौकशी करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे.
सांस्कृतिक भवनाची नोंदच नाही!
महापालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त सोमनाथ आढाव यांच्याशी संपर्क साधला असता, या सांस्कृतिक भवनासंदर्भात विभागाकडे कोणतीही नोंद नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, समाज विकास विभागाचे अधिकारी असंग पाटील यांनीही आपल्या कार्यालयाकडे याबाबत कोणतीही माहिती अथवा नोंद उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले.
लहुजी वस्ताद साळवे सांस्कृतिक भवनासंदर्भात तक्रार प्राप्त झाली आहे. वास्तूची प्रत्यक्ष पाहणी करून पुढील कार्यवाही करण्यात येईल. ज्या उद्देशाने भवन उभारले आहे, त्याला हरताळ फासून अन्य उपक्रम सुरू असतील, तर ते चुकीचे आहे.
भास्कर महाडिक, सहायक आयुक्त, ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय