सासवड: राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार शिधापत्रिकांचे शुद्धीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ‘मिशन सुधार अभियान’ अंतर्गत मृत, दुबार, बोगस आणि अपात्र लाभार्थ्यांची नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या मोहिमेमुळे पुरंदर तालुक्यातील जवळपास ६ हजार शिधापत्रिकाधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, आयकर विवरणपत्र (आयटीआर) भरणारे, तसेच भविष्य निर्वाह निधी (पीएफ) जमा होत असलेल्या कुटुंबांचा यामध्ये समावेश आहे.
पुरंदर तालुक्यात २ लाख लाभार्थ्यांना अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अन्नधान्याचे वितरण केले जाते. या योजनेचा लाभ खऱ्या अर्थाने पात्र आणि गरजू कुटुंबांनाच मिळावा, तसेच अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून वगळता यावे, यासाठी ‘राइटफुल टार्गेटिंग’ या संकल्पनेवर आधारित मिशन सुधार अभियान राबविण्यात येत आहे.
केंद्र सरकारने आधार क्रमांक आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील उपलब्ध माहितीच्या आधारे संशयास्पद लाभार्थ्यांची यादी तयार केली आहे. त्यानुसार उच्च उत्पन्न गटातील कुटुंबे, दुबार आधार क्रमांक, चारचाकी वाहनधारक, मृत व्यक्तींची नावे, शासकीय नोकरीत असलेले किंवा आयकर भरणारे कुटुंबीय, तसेच कंपनीचे संचालक अशा विविध निकषांवर लाभार्थ्यांची पडताळणी केली जात आहे.
पुरंदर तालुक्यात आयकर विवरणपत्र भरणारे आणि पीएफ जमा होत असलेल्या लाभार्थ्यांची जवळपास ६ हजार नावे समोर आली आहेत. संबंधित लाभार्थ्यांना नोटिसा बजावल्या असून, अन्नसुरक्षा योजनेच्या निर्धारित उत्पन्न मर्यादेपेक्षा आपले कौटुंबिक उत्पन्न अधिक आहे किंवा नाही, याबाबत लेखी खुलासा तहसील कार्यालय, पुरंदर येथे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुरवठा विभागाचे निरीक्षक या प्रकरणांची पडताळणी करीत आहेत. या तपासणीनंतर प्राप्त अहवालाच्या आधारे तहसीलदारांकडून संबंधित शिधापत्रिकांबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
नोटीस आली म्हणजे लाभ तत्काळ बंद नाही!
दरम्यान, नोटीस प्राप्त झाली म्हणून संबंधित लाभार्थ्यांचा अन्नधान्याचा लाभ तत्काळ बंद करण्यात येणार नाही. पडताळणी पूर्ण होऊन अंतिम निर्णय होईपर्यंत शिधापत्रिकेवरील अन्नधान्याचा लाभ पूर्ववत सुरू राहणार आहे. नोटीस प्राप्त झालेल्या लाभार्थ्यांनी घाबरून न जाता आपली वस्तुस्थिती स्पष्ट करणारा लेखी खुलासा आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालयात सादर करावा, असे आवाहन तहसीलदार विक्रम राजपूत यांनी केले आहे.