Green Peas Pudhari
पुणे

Purandar Peas: पुरंदरचा वाटाणा बहरला; गोड चवीमुळे पुणे-मुंबईसह परराज्यांतही मोठी मागणी

१,४०६ हेक्टरवर लागवड; अवघ्या ४५ ते ५० दिवसांत उत्पादन, चांगला बाजारभाव मिळत असला तरी उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांची चिंता

पुढारी वृत्तसेवा

सासवड: पुरंदर तालुक्याच्या शेती अर्थकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या वाटाणा पिकाचा खरीप हंगाम सध्या बहरात आला आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गोड चवीमुळे बाजारपेठेत पुरंदरच्या वाटाण्याला विशेष मागणी आहे. 'पुरंदरचा वाटाणा' म्हटले की चांगला दर देऊनही तो खरेदी करण्यासाठी ग्राहक व व्यापारी तयार असतात. त्यामुळे अवघ्या दोन ते तीन महिन्यांच्या हंगामात या पिकातून लाखो रुपयांची उलाढाल होते.

पुरंदरच्या पश्चिम पट्ट्यातील गराडे, हिवरे, चांबळी, भिवरी, बोपगाव, भिवडी, कोडीत, आस्करवाडी, सोमर्डी आणि पठारवाडी परिसरात प्रामुख्याने एम. पी. थ्री आणि गोल्डन या जातींच्या वाटाण्याची लागवड केली जाते. कमी कालावधीत उत्पन्न देणारे हे पीक शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर मानले जाते.

गोड चव, मोठी मागणी; कमी दिवसांत उत्पादन

पुरंदरचा वाटाणा तरकारीवर्गातील प्रमुख पीक असून, कमी पाण्यात आणि कमी कालावधीत येणारे पीक म्हणून त्याला शेतकऱ्यांची पसंती आहे. शेंगांचा विशिष्ट आकार, दाण्यांची संख्या आणि गोड चव ही पुरंदरच्या वाटाण्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील विविध बाजारपेठांमध्ये त्याला चांगली मागणी असते. साधारण ४५ ते ५० दिवसांत वाटाणा तोडणीस येत असल्याने कमी कालावधीत उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून त्याकडे पाहिले जाते.

पुणे, मुंबईसह परराज्यांत मागणी

पुरंदरच्या वाटाण्याची चव आणि दर्जा यामुळे विविध भागांतील व्यापारी खरेदीसाठी तालुक्यात दाखल होतात. सासवड व दिवे येथील स्थानिक बाजारपेठेबरोबरच पुण्यातील गुलटेकडी मार्केट आणि मुंबईतील वाशी बाजारपेठेतही पुरंदरचा वाटाणा मोठ्या प्रमाणात पाठविला जातो. महाड, नाशिक तसेच विविध राज्यांतील व्यापारीही थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन वाटाणा खरेदी करीत आहेत. काही व्यापारी रोख पैसे देऊन जागेवरच माल उचलत असल्याने शेतकऱ्यांना बाजारपेठेचा शोध घेण्याची गरज कमी झाली आहे.

पुरंदर तालुक्यात यंदा जवळपास १४०६ हेक्टर क्षेत्रावर वाटाणा पिकाची पेरणी झाली आहे. तालुक्याच्या शेती अर्थकारणात वाटाणा पिकाचे महत्त्व मोठे असून, चालू हंगामात पिकाची वाढही चांगली झाली आहे.
श्रीधर चव्हाण, कृषी अधिकारी, पुरंदर
वाटाण्याला सध्या चांगला बाजारभाव मिळत आहे. मात्र, उत्पादन घटल्याने अपेक्षित उत्पन्नावर परिणाम झाला आहे. कमी कालावधीत येणारे आणि चांगला दर मिळवून देणारे पीक असल्याने शेतकऱ्यांचा वाटाण्याकडे कल कायम आहे. वाटाणा पिकासाठी रोटरणी, पेरणी, शेणखत, रासायनिक खते, बियाणे, खुरपणी, औषध फवारणी आणि काढणीपर्यंत साधारण २० ते २५ हजार रुपये खर्च येतो. सध्या बाजारभाव समाधानकारक असला तरी यंदा उत्पादनात घट झाल्याने अपेक्षित आर्थिक फायदा मिळण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे.
माउली दत्तात्रय गायकवाड, शेतकरी, हिवरे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT