Green Peas Pudhari
पुणे

Purandar Parner Peas: पुरंदर-पारनेर मटारची बाजारात एंट्री; घाऊक दर ८०० रुपयांवर, किरकोळ विक्री १४० रुपयांपर्यंत

स्थानिक मटारच्या आवकेने परराज्यातील मागणी थांबली; हिरवी मिरची, घेवडा, ढोबळी मिरचीचे दर १० टक्क्यांनी घसरले

पुढारी वृत्तसेवा

शंकर कवडे

पुणे: ‘गोड चव’ अशी ओळख असलेल्या हिरव्या, टपोऱ्या दाण्यांच्या पुरंदर, पारनेर मटारचा हंगाम सुरू झाला आहे. रविवारी मार्केट यार्डात या मटारची २०० गोण्यांची आवक झाली. घाऊक बाजारात दहा किलोस ६०० ते ८०० रुपये भाव मिळाला, तर किरकोळ बाजारात या मटारची सुमारे १२० ते १४० रुपये किलो भावाने विक्री होत आहे. स्थानिक मटारचा हंगाम सुरू झाल्याने व्यापाऱ्यांनी परराज्यातील मागणी थांबविल्याने बाजारात पुरंदर, पारनेर, वाई आणि सातारा येथून आलेल्या मटारचा दबदबा दिसून आला.

परराज्यातून हिरवी मिरची आणि घेवडा, तर स्थानिक भागातून ढोबळी मिरची, कोबीसह मटारची आवक वाढल्याने त्यांच्या दरात दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. उर्वरित सर्व फळभाज्यांची आवक-जावक कायम असल्याने दर टिकून आहे. रविवारी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात राज्यासह परराज्यांतून शंभर ट्रकमधून शेतमालाची आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत ती स्थिर राहिली.

परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक येथून हिरवी मिरची १८ ते २० टेम्पो, कर्नाटक येथून कोबी ३ ते ४ टेम्पो, कर्नाटकातून घेवडा २ ते ३ टेम्पो, गुजरात आणि कर्नाटकातून भुईमूग शेंग ४ ते ५ टेम्पो, इंदूर येथून गाजर ३ ते ४ टेम्पो, कर्नाटक येथून पावटा २ ते ३ टेम्पो, आंध्र प्रदेश व तामिळनाडू येथून शेवगा ३ ते ४ टेम्पो, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी १०० क्रेट, मध्य प्रदेश येथून लसणाची सुमारे १० ते १२ टेम्पो आणि इंदूर, आग्रा येथून बटाट्याची ४० टेम्पो आवक झाली. स्थानिक भागातून सातारी आले सुमारे ४०० ते ५०० गोणी, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ३ ते ४ टेम्पो, टोमॅटो १० ते १२ हजार क्रेट, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो झाली.

पालेभाज्या आवाक्यात; पुदिना, पालकचे भाव घसरले

रविवारी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात पालेभाज्यांची आवक वाढल्याने बहुतांश पालेभाज्यांच्या भावात घट झाली. बाजारात मागणी चांगली असली तरी वाढलेल्या आवकेमुळे कोथिंबीर, शेपू आणि चाकवतच्या शेकडा जुडीमागे २०० रुपयांनी, तर पुदिना आणि पालकच्या शेकडा जुडीमागे ५०० ते ८०० रुपयांनी भाव कमी झाले.

अन्य पालेभाज्यांचे यापूर्वी कमी झालेले भाव स्थिर राहिले. रविवारी मार्केट यार्डात कोथिंबिरीची सुमारे २ लाख जुडी, तर मेथीची सुमारे १ लाख जुडी आवक झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. घाऊक बाजारात पालेभाज्यांची प्रतिजुडी 3 ते १५ रुपये, तर किरकोळ बाजारात प्रतिजुडी ५ ते २५ रुपये दराने विक्री सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT