हनुमंत वाघले
नायगाव : आगामी होऊ घातलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पुरंदरमध्ये सर्वच पक्षांत इच्छुकांची भाऊगर्दी दिसत आहे. मात्र, महायुती-महाविकास आघाडी की ’एकला चलो रे’, याबाबत वरिष्ठांचा आदेश काय? याची उत्सुकता इच्छुकांना लागली आहे.(Latest Pune News)
माळशिरस-बेलसर, दिवे-गराडे, वीर-भिवडी व निरा-कोळविहिरे अशा चार जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समिती गणांमध्ये अटीतटीची लढत पाहायला पुरंदरकरांना उत्सुकता लागून राहिली आहे. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व इतर पक्षांतील इच्छुक उमेदवारांनी सोशल मीडियावर प्रचाराची सुरुवात केली आहे. सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात इच्छुक सहभागी होऊ लागले आहेत. काहींनी व्हॉट्सॲप, फेसबुक, तसेच इतर समाज माध्यमांमधून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याचबरोबर आपल्या मतदारसंघातील गावागावांत दिवाळीनिमित्त शुभेच्छा बॅनर झळकविले आहेत.
राज्याच्या राजकारणातील युती-आघाडी धर्म पाळायचा की स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायचा, याबाबत अद्याप कोणत्याही पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. यामुळे इच्छुक उमेदवार ’वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. राज्याच्या राजकारणातील युती-आघाडी धर्म पाळायचा झाल्यास अनेक इच्छुक उमेदवारांच्या पदरी निराशा येईल व परिणामी बंडखोरी अथवा उमेदवारांची इन्कमिंग-आउटगोइंग पाहायला मिळेल. यामुळे सर्वच पक्षांनी सावध पवित्रा घेतलेला आहे.
पुणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसला आपले वर्चस्व अबाधित ठेवायचे असेल तर जिल्ह्यातील विद्यमान आमदारांना सोबत घेणे गरजेचे आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. यामुळेच की काय पुरंदरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकत्र येऊ शकते, अशी सर्वसामान्यांमध्ये चर्चा आहे.
पुरंदरमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली असल्यामुळे सासवड व जेजुरी नगरपरिषद भाजप स्वबळावर लढू शकते. पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत मात्र एकट्या भाजपची दमछाक होईल. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे देखील तालुक्यात प्रबळ असे उमेदवार आहेत. प्रत्यक्षात उमेदवार कोण? यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे. पुरंदरमध्ये पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत स्वबळाचा नारा एकाही पक्षाला झेपणार नाही. यामुळेच पुरंदरमधील सर्वपक्षीय नेतेमंडळी वरिष्ठांच्या आदेशाची वाट पाहत आहेत.