

मंचर : आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरातील स्मशानभूमीत पुन्हा एकदा अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रकार समोर आला आहे. मृतदेह जाळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी सांगाड्यावर पुष्पहार, लिंबू, लाल कापड, टाचण्या आणि बाहुली ठेवल्याचे आढळून आले. हा प्रकार सोमवारी (दि. 20) अमावास्येच्या रात्री घडल्याचे, तर तो मंगळवारी (दि. 21) सकाळी उघड झाल्याचे समजते.(Latest Pune News)
अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांना हा प्रकार समजला. गेल्या 3 महिन्यांतील ही चौथी घटना असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे प्रकाश थोरात (मंचर) यांनी सांगितले. नगरपंचायतीने यापूर्वीच खबरदारी म्हणून स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. तरीदेखील पुन्हा असा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. विज्ञानयुगातही अंधश्रद्धेचे सावट कायम राहिल्याने, नागरिकांनी अशा कृतींना आळा घालावा, अशी मागणी होत आहे. नगरपंचायतीने खबरदारी म्हणून स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. मात्र तरीही असे प्रकार होत आहेत. अशा प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी होत आहे. मानवी भावना आणि भीतीचा गैरफायदा घेत काहीजण जादूटोण्याच्या नावाखाली अशा कृती करत असल्याचे नागरिकांचे मत आहे.
मंचर नगरपंचायतीने बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सोमवारी रात्री दहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान 30 ते 40 वयोगटातील दोघेजण संशयास्पद हालचाली करताना दिसून आले. त्यांनीच हे साहित्य
ठेवले असल्याचे कॅमेरात स्पष्ट दिसत आहे. ‘माणूस मेल्यानंतरही त्याला शांतता नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. अंधश्रद्धा आणि भीतीच्या नावाखाली अशा कृती घडतात, हे समाजासाठी लज्जास्पद आहे.’ असे मत सागर गांजाळे यांनी व्यक्त केले.