

पिंपरखेड : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे आठ दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात शिवन्या बोंबे या चिमुकलीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन करत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात तीन बिबटे जेरबंद झाले आहेत. मात्र, पिंपरखेडमध्ये आणखी बिबटे असून, दोन दिवसांपूर्वी तीन ठिकाणी बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. नरभक्षक बिबट्या मोकाटच असून, या परिसरातील बिबटे जेरबंद करण्यासाठी वन विभागाने सांगितल्याप्रमाणे शंभर पिंजरे येणार कधी ? असा प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे.(Latest Pune News)
पिंपरखेड येथील घटनेनंतर बिबट्याच्या समस्येबाबत संतप्त ग्रामस्थांनी बेल्हे- जेजुरी राज्यमार्गावर रास्तारोको आंदोलन केले. त्या वेळी वन विभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करण्याचे व परिसरात शंभर पिंजरे लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तीन बिबटे जेरबंद होऊनही परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरुच आहे. पिंजऱ्यांची संख्यादेखील वाढविण्यात आलेली नाही. बिबट्याच्या हल्ल्यातून तीन महिला थोडक्यात बचावल्याने नागरिकांनी पुन्हा एकदा वन विभागाच्या कारभारावर तीव नाराजी व्यक्त केली.
शिवन्यावर हल्ला करणारा बिबट जेरबंद झाल्याचे अजून निष्पन्न झाले नसल्याने नरभक्षक बिबट्या अजूनही मोकाट असण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली. वन विभागाने तातडीने या परिसरामध्ये पिंजऱ्यांची संख्या वाढवून बिबट्यांना जेरबंद करावे,
रास्तारोको आंदोलनावेळी जुन्नर विभागाचे उप वनसंरक्षक संतोष खाडे यांनी दोन दिवसात शंभर पिंजरे या परिसरात लावण्याचे निर्देश वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, अद्याप या भागात पिंजऱ्यांची संख्या वाढविण्यात आलेली नाही. शंभर पिंजरे येणार कधी अन् बिबट्यांचा बंदोबस्त होणार कधी, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.
पिंपरखेड आणि परिसरात सध्या फक्त सातच पिंजरे आहेत. वन विभागाने बिबट्याची संख्या व हल्ल्याचे प्रमाण पाहता तातडीने आणखी पिंजरे लावावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.