

कोरेगाव भीमा : शिरूर-हवेली मतदारसंघातील केसनंद (ता. हवेली) येथे मतदार याद्यांमधील बोगस नोंदींचा भंडाफोड झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली. गावातील घर क्रमांक 1 मध्ये तब्बल 188 विविध जाती-धर्मांचे मतदार राहतात, अशी नोंद असल्याने या घरासमोर सोमवारी (दि. 20) भेट देऊन त्यांनी प्रतीकात्मक पद्धतीने फटाके फोडत बोगस मतदारांची दिवाळी उडवली.(Latest Pune News)
या वेळी आमदार रोहित पवार म्हणाले की, बोगस मतदारांच्या माध्यमातून खासदार निवडून आणून राज्यघटना, आरक्षण आणि लोकशाही संपविण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशभरात बोगस मतदारांची नोंद करण्यात आली असून, हे आता लपून राहिलेले नाही. केसनंदमध्ये एका घरात 188 मतदार दाखविले आहेत; पण प्रत्यक्षात असे कोणतेही घर अस्तित्वात नाही. ही लोकशाहीची हत्या आहे. शिरूर मतदारसंघातील केसनंद गावातील सुमारे 11 हजार मतदारांपैकी तब्बल 2 हजार 200 मतदार बोगस असल्याचे समोर आले आहे. काही नावे मतदार यादीत कधी आली, कुणालाच ठाऊक नाही. काही संस्थांकडून ’कॉन्ट्रॅक्ट बेसिस’वर बाहेरचे लोक आणून मतदान करून घेतले जाते. ही केवळ मतदानाची नाही, तर लोकशाहीची मोठी चोरी आहे.
केसनंद गटातील 326 बूथची तपासणी केली असता 94 दुबार नावे आढळली. दुबार नोंदणीमुळे डबल मतदान होत आहे. जर अशी वोट चोरी झाली नसती, तर माजी आमदार अशोक पवार पुन्हा निवडून आले असते. हे सरकार वोट चोरीवर निवडून आले असून शेतकरी, युवक, महिला, विद्यार्थी यांसारख्या कोणत्याही प्रश्नांकडे या सरकारचे लक्ष नसल्याचे रोहित पवार म्हणाले. आज आम्ही फटाके फोडले ते दिवाळी साजरी करण्यासाठी नव्हे, तर मतदारांना जागे करण्यासाठी. लोकशाही वाचविण्यासाठी आता जनता पुढे यायला हवी, असे आवाहनही पवार यांनी केले.
या वेळी माजी आमदार अशोक पवार, राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे, तालुका उपाध्यक्ष अशोक गायकवाड तसेच गोरख सातव, चंद्रकांत सातव, पोपट हरगुडे, महेश सातव, कुशल सातव, मंदाकिनी गायकवाड, शोभा हरगुडे, सुरेखा भोरडे, सीता जाधव आदींसह अनेक पदाधिकारी, ग्रामस्थ आणि कार्यकर्ते उपस्थित होते.