Purandar Airport Project Pudhari
पुणे

Purandar International Airport: पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद; 920 एकरांसाठी संमती

चार दिवसांत 115 कोटींचा मोबदला वाटप; प्रतिएकर सरासरी दोन कोटींपर्यंत भरपाई

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग आला असून, मोबदल्याचे सूत्र निश्चित झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून संमतीपत्रे देण्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 920 एकर जमिनींसाठी शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे संमती दिली असून, गेल्या चार दिवसांत तब्बल 115 कोटी रुपयांच्या मोबदल्याचे वितरण करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, विमानतळासाठी सात गावांमधील जमीन संपादित केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मूळ शेतकऱ्यांनाच मोबदला देण्यात येत असून, संमती करारनामा पूर्ण होताच संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा केली जात आहे. गुंतवणूकदारांना सध्या कोणताही मोबदला देण्यात आलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भूसंपादनासाठी बाधित शेतकऱ्यांना प्रतिएकर किमान 1 कोटी 61 लाख रुपयांचा दर निश्चित करण्यात आला आहे. घर, फळबाग, बोअरवेल तसेच इतर घटकांचा विचार करता सरासरी प्रतिएकर दोन कोटी रुपयांपर्यंत मोबदला मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, संमती देण्याचे प्रमाण वाढत आहे.

दरम्यान, विमानतळ प्रकल्प रद्द झाल्यास 25 टक्के व्याजासह रक्कम परत घेतली जाईल किंवा काहींना अधिक मोबदला मिळणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. या अफवांमुळे संभ्रम निर्माण होत असल्याने संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

जमिनींवर बँकांचे बोजे असल्यास संबंधित शेतकऱ्यांनाच ती रक्कम भरावी लागणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, प्रक्रिया सुलभ करण्यासाठी बँकांशी समन्वय साधला जात असून, अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT